स्तनपानाविषयी गैरसमजुती असल्यास करा दूर (फोटो सौजन्य - iStock)
स्तनपान हा बाळाला संपूर्ण पोषण देण्याचा सर्वात उत्तम असा नैसर्गिक आणि आरोग्यदायी मार्ग आहे. मात्र अजूनही याबाबत अनेक गैरसमज समाजात पसरलेले दिसतात जे नवमातांना गोंधळात टाकणारे आहे. स्तनपान हे बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे, स्तनपानाबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आणि स्तनपानाबाबत योग्य माहिती मिळवणे आवश्यक आहे. डॉ. सोनल कतारमल, स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा, पुणे यांनी याबाबत आम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत, तुम्हीही हे समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे (फोटो सौजन्य – iStock)
स्तनपानाचे फायदे
स्तनपानाने आई आणि बाळाला आरोग्यासंबंधी असंख्य फायदे मिळतात. स्तनपानाने बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, मेंदूच्या विकासाला चालना मिळते आणि आई आणि बाळ या दोघांमध्ये एक मजबूत नाते निर्माण होते. स्तनपान हे प्रसूतीनंतर जलद पुनर्प्राप्तीस मदत करते आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका देखील कमी करते. हे सर्व फायदे असूनही, सोशल मीडियावर पसरणाऱ्या अनेक गैरसमजूती किंवा अफवा या नवमातांमधील तणावास कारणीभूत ठरतात.
नवमातांना स्तनपानाबाबत आत्मविश्वास आणि आधार मिळावा यासाठी या गैरसमजूती दूर करुन त्याबाबत वास्तविकता जाणून घेणे गरजेचे आहे. स्तनपानाबाबत असलेल्या शंका दूर करण्यासाठी डॉक्टर किंवा स्तनपान तज्ज्ञांशी उघडपणे चर्चा करावी तसेच वेळीच सल्ला घेणे गरजेचे आहे.
World breastfeeding day : आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार! ‘या’ आजारांपासून बालकांचा होतो बचाव
काय आहेत स्तनपानाबाबतच्या गैरसमजूती आणि वास्तविकता?
१. गैरसमज: महिलांनी चिकाचे दूध (कोलोस्ट्रम) फेकून द्यावे कारण ते चांगले नाही
वास्तविकता : कोलोस्ट्रम म्हणजेच चिकाच्या दूधात अँटीबॉडीज आणि पोषक घटक असतात. ते बाळाला विविध संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.
२. गैरसमज : स्तनपान करणाऱ्या मातांनी पुरेशा दुधाच्या साठ्याकरिता केवळ दूधाचे सेवन करावे
वास्तविकता: स्तनदा मातेने हायड्रेटेड राहणे अधिक गरजेचे आहे. दुधाचे उत्पादन हे बाळाच्या गरजेनुसार आणि आईच्या एकूण आहारावर अवलंबून असते, ते केवळ दुधाच्या सेवनाने वाढत नाही. स्तनदा मातेने पुरेशा कॅलरीजचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. म्हणून, तज्ज्ञांच्या मदतीने आहारात ताजी फळे, भाज्या, तृणधान्य आणि कडधान्ये यांचा समावेश करावा.
३. गैरसमज: सर्दी किंवा ताप आल्यावर स्तनदा मातांनी आपल्या बाळाला स्तनपान करणे टाळावे
वास्तविकता: खरंतर स्तनदा मातांनी आजारी असले तरीही स्तनपान सुरुच ठेवावे. आपले शरीर आजाराशी लढण्यासाठी ॲंटीबॉडीज तयार करते जे आईच्या दुधाद्वारे बाळाला पोहोचतात, ज्यामुळे बाळाला त्या आजारापासून सुरक्षित राहण्यास मदत होते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वमर्जीने स्तनपान बंद करु नका. बाळाला नियमितपणे स्तनपान करा.
World Breastfeeding Week: नवजात बालकांसाठी स्तनपान का महत्त्वाचे, आई-बाळाची पहिली भेट
४. गैरसमज : स्तनाच्या आकारानुसार दुधाची उत्पादकता कमी जास्त असते
वास्तविकता: हा स्तनदा मातांमध्ये एक सामान्य गैरसमज आहे जो तणाव आणि चिंतेस कारणीभूत ठरतो. स्तनाच्या आकाराचा दुधाच्या उत्पादनाशी काहीही संबंध नसतो. दुधाचा पुरवठा बाळाच्या मागणीनुसार आणि बाळ किती चांगले स्तनपान करते यावर अवलंबून असतो. म्हणून, स्तनाच्या आकाराची काळजी करु नका.
५. गैरसमज: ज्या महिलांचे सी-सेक्शन झाले आहे त्या बाळाला स्तनपान करु शकत नाहीत
वास्तविकता: अनेक माता सी-सेक्शननंतर यशस्वीरित्या स्तनपान करतात आणि ते पूर्णपणे शक्य आहे. म्हणून, घाबरून जाण्याची गरज नाही;सी-सेक्शन प्रसूतीनंतरही बाळाला स्तनपान करता येते. स्तनपान देणाऱ्या मातांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाने मानसिक व शारीरीक आधार देणे तसेच स्तनपानाकरिता प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.