फोटो सौजन्य - Social Media
अंडी प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत आणि त्यात व्हिटॅमिन बी, फोलेट, असंतृप्त फॅटी ऍसिड्स, चरबीयुक्त व्हिटॅमिन्स (ए, डी, ई आणि के), कोलीन आणि आयर्न यांसारखी पोषक घटक असतात. अनेकदा असे ऐकायला मिळते की जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढते आणि आरोग्यास हानी पोहोचू शकते. मात्र संशोधकांनी या दाव्याच्या मागील अभ्यासांचे विश्लेषण करून याला चुकीचे ठरवले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की अंडी खाल्ल्याने वृद्ध व्यक्तींच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि कमी वयात मृत्यू होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो.
शोधकांनी वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या ASPREe अभ्यासाचा डेटा तपासला. 8,000 हून अधिक लोकांच्या अभ्यासात त्यांनी त्यांच्या आहाराचा अभ्यास करून वैद्यकीय नोंदी व अधिकृत अहवालांचा वापर केला. सहा वर्षांच्या कालावधीत किती जणांचे कोणत्या कारणाने निधन झाले हे पाहिले. यामध्ये अंडी खाण्याच्या सवयींनुसार लोकांना तीन गटांमध्ये विभागले गेले. पहिला गटात त्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला जे क्वचित अंडी खातात. महिन्यातून १ किंवा २ वेळा. दुसऱ्या गटात आठवड्यातून अनेकदा अंडी खाणाऱ्यांचा समावेश करण्यात आला. तर तिसऱ्या गटात दररोज अंडी खाणाऱ्यांचा समावेश करण्यात आला.
अभ्यासात असे आढळून आले की आठवड्यात 1 ते 6 वेळा अंडी खाणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका सर्वांत कमी होता. हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूंचा धोका 29 टक्के तर एकूण मृत्यूंचा धोका 17 टक्क्यांनी कमी झाला होता. विशेषज्ञांच्या मते, एक निरोगी व्यक्ती दररोज 2 ते 3 अंडी खाऊ शकतो. आठवड्यात 7 ते 10 अंडी खाणे सुरक्षित आहे. वर्कआउट करणारे किंवा अॅथलीट्स 4 ते 5 अंडी खाऊ शकतात. मात्र हृदयविकार असलेल्या लोकांनी दिवसाला दोनपेक्षा जास्त अंडी खाणे टाळावे. कोलेस्ट्रॉलच्या समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
अंडी खाण्याचे अनेक फायदे असतात. अंडी त्वचा, केस आणि नखांसाठी उपयुक्त असते. अंडी खाल्ल्याने इम्यून सिस्टिम मजबूत होते. डोळ्यांची दृष्टी सुधारते. व्यक्तीची स्मरणशक्ती वाढवते. हाडांना बळकट करते तसेच मांसपेशींना दुरुस्त करण्याचे काम करते. तसेच अंड्यांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते. ज्या लोकांना आरोग्य टिकवायचे असेल त्यांनी अंड्याचा समतोल आहारात समावेश केला पाहिजे, असा सल्लाही अभ्यासातून देण्यात आला आहे.