
एपिलेप्सीवर मात करणे शक्य: फक्त फिट्स थांबवण्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक उपचार देत आहेत रुग्णांना नवे आयुष्य
Epilepsy : एपिलेप्सी अर्थात अपस्मार म्हणजे केवळ वारंवार येणारे फिट्स किंवा झटके, असा सर्वसाधारण समज असतो; मात्र हा आजार त्यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचा आहे. हा विकार कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो. स्ट्रोक, मेंदूला झालेली इजा, मेंदूतील गाठ, मेंदूच्या विकासातील जन्मजात दोष किंवा मेंदूतील विद्युत लहरींमध्ये होणारे बिघाड यांसारख्या कारणांमुळे एपिलेप्सी होऊ शकते.याविषयी डॉ जयंती मणी, कन्सल्टन्ट, न्यूरॉलॉजिस्ट आणि एपिलेप्टोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी दिलेली सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
फिट्सचे स्वरूप प्रत्येक रुग्णात वेगवेगळे असू शकते. यामध्ये अंगाला झटके येणे किंवा शरीर ताठ होण्यापासून ते काही क्षणांसाठी ब्लँक होणे, विचित्र हालचाली करणे किंवा वागण्यात अचानक बदल होणे अशी लक्षणे दिसू शकतात. या आजाराच्या निदानासाठी डॉक्टरांकडून सखोल वैद्यकीय तपासणी केली जाते. यासोबतच EEG (‘ईईजी’) (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम), मेंदूचे स्कॅनिंग (ब्रेन इमेजिंग) आणि गरज भासल्यास दीर्घकाळ चालणारे video-EEG monitoring (‘व्हिडिओ-ईईजी मॉनिटरिंग’) यांसारख्या आधुनिक तपासण्या केल्या जातात.
उपचारांची सुरुवात साधारणपणे फिट्स रोखणाऱ्या औषधांनी केली जाते. या औषधांमुळे सुमारे ६० ते ७० टक्के रुग्णांमध्ये फिट्स पूर्णपणे किंवा बऱ्याच अंशी नियंत्रणात येतात. नव्या पिढीची औषधे रुग्णांना अधिक सहजपणे सहन होतात, त्यांचे दुष्परिणाम खूप कमी असतात आणि इतर आजारांच्या औषधांशी त्यांची कोणतीही विपरीत प्रतिक्रिया होत नाही. तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि योग्य निवडीसह यातील काही औषधे गरोदरपणातही सुरक्षितपणे वापरता येतात.
योग्य उपचारांच्या मदतीने एपिलेप्सी असलेले बहुतांश रुग्ण शिक्षण घेऊ शकतात, नोकरी-व्यवसाय करू शकतात, प्रवास करू शकतात, नातेसंबंध जोपासू शकतात, पालक होऊ शकतात आणि कोणावरही अवलंबून न राहता स्वतंत्र आयुष्य जगू शकतात.
योग्य उपचार सुरू असूनही सुमारे ३० टक्के रुग्णांमध्ये फिट्स येणे सुरूच राहते. जेव्हा दोन योग्य प्रकारची फिट्सविरोधी औषधे देऊनही झटके नियंत्रणात येत नाहीत, तेव्हा या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘ड्रग-रेझिस्टंट एपिलेप्सी’ अर्थात औषधांना दाद न देणारी एपिलेप्सी म्हटले जाते.
अशा स्थितीत, काही निवडक रुग्णांसाठी ‘एपिलेप्सी शस्त्रक्रिया’ हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. या शस्त्रक्रियेमुळे फिट्सचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्याची आणि अनेक प्रकरणांमध्ये फिट्सपासून पूर्णपणे मुक्ती मिळण्याची दाट शक्यता असते.
मात्र, औषधे अपयशी ठरल्यानंतर लगेचच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात नाही. त्यापूर्वी मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागातून फिट्स सुरू होतात, हे शोधण्यासाठी अत्यंत सखोल तपासण्या केल्या जातात. तसेच, संबंधित भागावर उपचार करताना रुग्णाची वाचा, स्मरणशक्ती, हालचाली किंवा दृष्टी यांवर कोणताही परिणाम होणार नाही ना, याची पूर्ण खात्री केली जाते.
शस्त्रक्रियेपूर्वीच्या मूल्यमापनामध्ये दीर्घकाळ चालणारे video-EEG (व्हिडिओ-ईईजी), हाय-रिझोल्यूशन MRI (एमआरआय) आणि न्यूरोसायकॉलॉजिकल चाचण्यांचा समावेश असू शकतो. याशिवाय गरजेनुसार पीईटी स्कॅन, फंक्शनल MRI (एमआरआय) आणि stereo-EEG (‘स्टीरिओ-ईईजी’) या तपासण्याही केल्या जातात. Stereo-EEG (‘स्टीरिओ-ईईजी’) मध्ये मेंदूच्या निवडक भागांमध्ये अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रोड्स बसवले जातात. यामुळे फिट्स नेमके कोठून सुरू होतात आणि मेंदूत कसे पसरतात, याचे अचूक निदान करता येते.
सर्वसमावेशक एपिलेप्सी सेंटर्समध्ये ३-टेस्ला MRI (एमआरआय), पीईटी/स्पेक्ट, video-EEG (व्हिडिओ-ईईजी) आणि stereo-EEG (स्टीरिओ-ईईजी) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची सोय असते. येथे न्यूरोलॉजिस्ट, एपिलेप्टोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, न्यूरोसायकॉलॉजिस्ट आणि इतर तज्ज्ञांची एक विशेष टीम एकत्रितपणे काम करते. या समन्वयामुळे विशेषतः गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार करणे शक्य होते.
प्रत्येक रुग्णाच्या आजाराच्या स्वरूपानुसार एपिलेप्सी शस्त्रक्रियेचे नियोजन केले जाते. यामध्ये मेंदूतील फिट्स निर्माण करणारा भाग काढून टाकणे, त्याचा मेंदूच्या इतर भागांशी असलेला संपर्क तोडणे किंवा अत्यंत सूक्ष्म छिद्राद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचा समावेश असू शकतो.
रुग्ण शुद्धीत असताना केली जाणारी मेंदूची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेदरम्यान केले जाणारे इलेक्ट्रिकल मॅपिंग आणि सततचे मॉनिटरिंग यांसारख्या प्रगत तंत्रांमुळे सर्जन्सना मेंदूच्या महत्त्वाच्या कार्यांचे संरक्षण करता येते. ज्या रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करणे शक्य नसते, त्यांच्यासाठी ‘न्यूरोमॉड्युलेशन’ तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. यामध्ये ‘व्हॅगस नर्व्ह स्टिम्युलेशन’, ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ आणि ‘रिस्पॉन्सिव्ह न्यूरोस्टिम्युलेशन’ यांसारख्या पद्धतींचा वापर करून फिट्स येण्याची वारंवारता कमी करण्यास मदत होते.
एपिलेप्सीचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यापुरता मर्यादित नसतो. या आजारामुळे रुग्णांमध्ये चिंता, नैराश्य आणि समाजापासून एकाकी पडल्याची भावना निर्माण होऊ शकते. लहान मुलांच्या बाबतीत लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती, वर्तणूक आणि शैक्षणिक कामगिरी यांवर परिणाम होण्याची आव्हाने उभी राहू शकतात.
त्यामुळे काउन्सेलिंग, मानसिक आधार आणि कुटुंबीयांचे प्रबोधन हे उपचारांचे अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. या आजाराविषयी समाजात योग्य समज निर्माण करणे, फिट्स आल्यास करावयाचे प्रथमोपचार, नियमित औषधोपचार पाळणे आणि रुग्णांना सामावून घेणारे सकारात्मक वातावरण तयार करणे, यामध्ये पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली असली तरी, एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींना आजही शाळा, कामाचे ठिकाण आणि समाजात भेदभावाचा सामना करावा लागतो. अशा वेळी समाजात जनजागृती करणे आणि रुग्णांचे मनोबल वाढवणे, यामध्ये स्वयंसेवी आणि आधार देणाऱ्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.
‘इंडियन एपिलेप्सी असोसिएशन’ने भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, एपिलेप्सी रुग्णांना आरोग्य विम्याच्या कक्षेतून परस्पर वगळण्याची अन्यायकारक पद्धत बदलण्यास मोठी मदत झाली आहे. सर्वसमावेशकता आणि समान हक्कांच्या दिशेने टाकलेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
आधुनिक एपिलेप्सी उपचार हे आता केवळ फिट्स नियंत्रित करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तर मेंदूच्या कार्यांचे संरक्षण करणे, भावनिक स्वास्थ्याला आधार देणे, रुग्णांना स्वावलंबी बनवणे आणि एपिलेप्सीसोबत जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक परिपूर्ण व आनंदी आयुष्य जगण्याची संधी मिळवून देणे, हे या उपचारांचे मुख्य उद्दिष्ट बनले आहे.
Ans: एपिलेप्सी म्हणजे मेंदूशी संबंधित एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. मेंदूतील विद्युत संकेतांमध्ये असामान्य बदल झाल्यामुळे वारंवार फिट्स किंवा झटके येऊ शकतात.
Ans: अचानक बेशुद्ध पडणे, शरीराला झटके येणे, काही वेळ शुद्ध हरपणे, रिकाम्या नजरेने पाहत राहणे, अचानक गोंधळल्यासारखे होणे आणि काही काळासाठी हालचालींवर नियंत्रण न राहणे ही संभाव्य लक्षणे आहेत.
Ans: अनेक रुग्णांमध्ये योग्य औषधोपचारांमुळे फिट्स नियंत्रणात ठेवणे शक्य होते. काही रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा इतर आधुनिक उपचारपद्धतींचाही फायदा होऊ शकतो. उपचारांचे यश एपिलेप्सीच्या प्रकारावर आणि कारणांवर अवलंबून असते.