
कर्करोगाच्या औषधांच्या किमती ७०% घटणार! औषधांच्या विक्रीतील नफ्याच्या मार्जिनवर ३० टक्क्यांची मर्यादा
Health Update कर्करोगाच्या उपचारांचा वाढता खर्च न पेलणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किमतींच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या कर्करोगावरील औषधांच्या विक्री आणि पुरवठ्यातील व्यापार मार्जिन ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित औषधांच्या एमआरपी म्हणजेच किरकोळ किमतीत ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असून, रुग्णांची वर्षाला सुमारे २,५०० कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज केंद्रीय औषध विभागाने व्यक्त केला आहे.(फोटो सौजन्य – AI)
कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णांना अनेकदा दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. काही औषधांचा खर्च मोठा असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक ताण येतो. अशा परिस्थितीत औषधांच्या किमतीत कपात झाल्यास उपचारांचा खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, सर्व कर्करोगाच्या औषधांच्या किमती सरसकट ७० टक्क्यांनी कमी होणार नसून, हा लाभ संबंधित निर्णयाच्या कक्षेत येणाऱ्या औषधांपुरता राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत आवश्यक औषधांच्या निर्धारित यादीतील औषधांवर सरकारकडून कमाल किंमत निश्चित करण्याची व्यवस्था आहे. नव्या निर्णयामुळे या यादीबाहेरील, म्हणजेच ‘नॉन-शेड्यूल्ड’ कर्करोगाच्या औषधांनाही किमत संरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. औषध उत्पादकापासून रुग्णापर्यंत औषधा पोहोचेपर्यंत आकारल्या जाणाऱ्या व्यापार मार्जिनवर ३० टक्क्यांची मर्यादा घालण्यात येणार आहे.
Dental Health: रोजच्या ‘या’ सवयींमुळे दात होतात खराब; वेळीच टाळा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
कोणत्या औषधांना या निर्णयाचा लाभ मिळणार, याची यादी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अंतर्गत तज्ज्ञ समिती अंतिम करणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोणत्या औषधांच्या किमती किती कमी होतील, हे संबंधित यादी आणि किंमतनिर्धारणाच्या तपशिलांनंतर स्पष्ट होईल. दरम्यान केंद्राच्या या निर्णयामुळे महागड्या कर्करोग उपचारांचा आर्थिक भार कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, औषधांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ न देता किंमत नियंत्रणाची अमलबजावणी करणे आणि रुग्णांना प्रत्यक्षात कमी दरात औषधे मिळत असल्याची खात्री करणे, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.