
photo- yandex
Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
बाळाचा जन्म हा कुटुंबासाठी आनंदाचा क्षण असतो. मात्र, बाळाची काळजी घेण्याच्या धावपळीत अनेकदा आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. बाळाला दूध पाजणे, त्याची देखभाल करणे, रात्रीची अपुरी झोप आणि बदललेल्या दिनक्रमाशी जुळवून घेणे, यामुळे आईवर शारीरिक आणि मानसिक ताण येतो. त्यातच प्रसूतीनंतर शरीर गर्भधारणा आणि प्रसूतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत असते. त्यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रसूतीनंतरचा आहार म्हणजे केवळ जास्त प्रमाणात खाणे नव्हे. शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, लोह, कॅल्शियम, चांगले स्निग्ध पदार्थ आणि पुरेसे द्रवपदार्थ मिळणे महत्त्वाचे आहे. आई बाळाला स्तनपान करत असल्यास तिच्या पोषणाच्या गरजा आणखी वाढू शकतात. त्यामुळे या काळात लगेच वजन कमी करण्यापेक्षा शरीराला सावरण्यासाठी पुरेसे आणि संतुलित पोषण मिळणे महत्त्वाचे आहे.
प्रसूतीदरम्यान झालेल्या रक्तस्रावामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच गर्भधारणा आणि प्रसूतीनंतर शरीरावर आलेला ताण यामुळे आईला थकवा जाणवू शकतो. योग्य आहार न मिळाल्यास शरीराची पूर्ववत होण्याची प्रक्रिया आणखी कठीण होऊ शकते.
स्तनपान करत असलेल्या मातांना काही पोषक घटक आणि द्रवपदार्थांची अधिक गरज असते. मात्र, बाळाच्या संगोपनाच्या धावपळीत अनेक मातांचे जेवण वेळेवर होत नाही. अशावेळी चहा, बिस्किटे किंवा पॅकेज्ड पदार्थांवर भूक भागवली जाते. मात्र, अशा पदार्थांऐवजी पोषक आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
लोहयुक्त पदार्थ : हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, मांस, अंडी आणि लोहयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. डॉक्टरांनी लोहाच्या गोळ्या दिल्या असल्यास त्या देखील सुरू ठेवाव्यात.
प्रथिने : डाळी, कडधान्ये, अंडी, मासे, चिकन, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पनीर, सोयाबीन आणि कडधान्यांपासून मिळणारी प्रथिने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि स्नायूंच्या पुनर्बांधणीसाठी उपयुक्त ठरतात.
कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्त्व : दूध, दही, पनीर आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे शरीराला कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत होते. त्याची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधांची गरज भासू शकते.
फळे आणि भाज्या : विविध रंगांची फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करा. त्यातून आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासेबतच एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
तृणधान्य : ओट्स, गव्हाची पोळी, ब्राऊन राईस आणि इतर संपूर्ण धान्यांमधून शरीराला ऊर्जा आणि तंतुमय पदार्थ मिळतात.
स्निग्ध पदार्थ : कडधान्ये, बिया, मासे आणि इतर आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश करता येतो. यामधून शरीराला आवश्यक फॅटी अॅसिड्स मिळतात.
पुरेसे द्रवपदार्थ : पाणी, सूप, दूध आणि इतर पौष्टिक द्रवपदार्थांचे पुरेसे सेवन करावे. विशेषतः स्तनपान करणाऱ्या मातांनी शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रसूतीनंतर बाळाच्या संगोपनात आई इतकी व्यस्त होते की, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यातच पूर्वीसारखी शरीरयष्टी कधी मिळणार, वजन कधी कमी होणार, असा दबावही जाणवतो. मात्र, प्रसूतीनंतरचा काळ हा लगेच वजन कमी करण्याची घाई करण्याचा नसून शरीराला सावरण्याचा आणि नव्या दिनक्रमाशी जुळवून घेण्याचा असतो. बाळाला सांभाळताना आईलाही पुरेसे आणि योग्य पोषण मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण प्रसूतीनंतर शरीराला पुन्हा ताकद मिळण्यासाठी योग्य आहार आणि पोषणाची गरज असते.