दररोज सकाळच्या नाश्त्याला वेगळं काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पोहे, उपमा, किंवा इडली तेच ते पदार्थ खाऊन देखील कंटाळ येतो. अशातच सकाळच्या धावपळीत झटपट तयार होणारा आणि पोटभरीचा नाश्ता हवा असेल, तर ही पालक चिला रेसिपी नक्की बनवा. घरात सहज उपलब्ध असलेल्या पालकापासून हा चिला कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतो. चविष्ट असल्यामुळे मोठ्यांसोबत मुलांनाही हा नाश्ता आवडू शकतो. पालकामुळे या पदार्थात पोषक घटकांचाही समावेश होतो. ताज्या हिरव्या पालकाचा स्वाद आणि मसाल्यांचा तडका यामुळे याची चव छान लागते. चला तर जाणून घेऊयात पालक बेसन चिल्याची सोपी रेसिपी.
सर्वप्रथम पालकाची पाने स्वच्छ पाण्याने २ ते ३ वेळा धुवून घ्या. त्यावरील माती किंवा धूळ पूर्णपणे निघाल्यानंतर पालक बारीक चिरून घ्या. एका भांड्यात बेसन आणि रवा किंवा तांदळाचे पीठ घ्या. त्यात आले-मिरचीची पेस्ट, कांदा, ओवा, हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घाला. आता त्यात चिरलेले पालक घालून सर्व साहित्य चांगले मिसळा. थोडे-थोडे पाणी घालत घट्टसर, पण सहज पसरवता येईल असे पीठ तयार करा. यानंतर, तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा तूप लावा. तयार पीठाचा थोडे तव्यावर ओतून गोलाकार चिला पसरवा. चिल्याच्या कडांना थोडे तेल किंवा तूप सोडा आणि मध्यम आचेवर भाजून घ्या.एक बाजू सोनेरी आणि कुरकुरीत झाली की चिला सावधपणे उलटा. दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घ्या. अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे चिले तयार करा.गरमागरम पालकाचा चिला हिरवी चटणी, दही किंवा आवडीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.