फोटो सौजन्य - Social Media
आपण नेहमी ऐकतो की शरीरातून घाम निघतो, पण कल्पना करा की घामाऐवजी चक्क रक्त वाहू लागले, तर? ही अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती हेमेटोहाइड्रोसिस म्हणून ओळखली जाते. या विकारात त्वचेवर घामाऐवजी रक्ताचे थेंब दिसतात. शरीराला कोणतीही जखम नसतानाही रक्त बाहेर येत असल्याने ही स्थिती खूप धक्कादायक वाटते.
हेमेटोहाइड्रोसिस ही एक अशी स्थिती आहे, जिथे रक्त त्वचेच्या छिद्रांमधून बाहेर येते. अत्यधिक मानसिक तणाव, भीती किंवा चिंता यामुळे शरीरातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या (केशिका) फुटतात आणि त्या घामाच्या ग्रंथींमध्ये मिसळतात. परिणामी, घामासोबतच रक्त बाहेर पडते आणि त्वचेसारख्या भागांवर रक्ताचे थेंब दिसू लागतात. या विकारामुळे कोणतीही वेदना होत नाहीत, पण तो अत्यंत दुर्मिळ असल्याने लोकांमध्ये भीती निर्माण करतो.
सर्वसाधारणपणे, हेमेटोहाइड्रोसिस ही स्थिती प्रामुख्याने मानसिक आणि शारीरिक तणावामुळे उद्भवते. अति भीती, सततचा मानसिक तणाव किंवा तीव्र चिंता यामुळे शरीराची नैसर्गिक तणावप्रतिकार प्रणाली (फाइट-ऑर-फ्लाइट रिस्पॉन्स) अति सक्रिय होते. या प्रक्रियेमुळे रक्तदाब वाढतो आणि शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्या (केशिका) ताणल्या जातात. काही वेळा, या केशिका तुटून त्या घामाच्या ग्रंथींमध्ये मिसळतात, परिणामी, घामासोबतच रक्त बाहेर पडते. मृत्यूची भीती, एखाद्या गंभीर संकटाचा सामना करताना किंवा तीव्र मानसिक धक्का बसल्यास, शरीर अशा प्रकारे अनपेक्षित प्रतिक्रिया देऊ शकते. ऐतिहासिक नोंदींनुसार, फाशीच्या शिक्षेच्या आधी असलेला तणाव, समुद्रातील प्रचंड वादळाचा धोका किंवा युद्धाच्या प्रसंगी सैनिकांना होणारा तीव्र तणाव यामुळेही ही स्थिती उद्भवली असल्याचे दिसून आले आहे. काही दुर्मिळ मानसिक आणि शारीरिक आजारांमुळे देखील हे घडू शकते.
सध्या हेमेटोहाइड्रोसिस या विकारावर कोणताही ठोस उपचार उपलब्ध नाही. मात्र, डॉक्टर या विकाराची तीव्रता कमी करण्यासाठी आणि मानसिक तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी काही औषधे आणि उपाय सुचवतात. बेंझोडायझेपिन्स आणि बीटा-ब्लॉकर्स यांसारखी औषधे चिंता आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, योगसाधना, ध्यानधारणा, मन:शांती वाढवणाऱ्या तंत्रांचा सराव, आणि तणाव व्यवस्थापनाच्या विविध पद्धती रुग्णासाठी फायदेशीर ठरू शकतात. आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि संतुलित जीवनशैली ठेवणे, पुरेशी झोप घेणे, तसेच मानसिक आरोग्यावर लक्ष देणे यामुळे या विकाराच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
हेमेटोहाइड्रोसिस हा एक अत्यंत दुर्मिळ विकार आहे, आणि जगभरात या आजाराची फारच थोड्या प्रमाणात नोंद झाली आहे. त्यामुळे या विकाराविषयी वैद्यकीय संशोधनही मर्यादित आहे. जरी ही स्थिती जीवघेणी नसली, तरी ती अत्यंत धक्कादायक असते आणि मानसिकदृष्ट्या तणाव वाढवणारी ठरते. त्यामुळे या आजाराचे निदान झाल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तणाव व्यवस्थापन आणि उपचार पद्धतींचे पालन करणे गरजेचे ठरते.