फोटो सौजन्य - Social Media
कळवा शहराला ठाण्याचे सॅटेलाईट शहर म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. ठाण्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे शहर, इथल्या हिरवळीसाठी प्रसिद्ध आहे. कळव्याच्या तसे दोन बाजू: एक चांगलीच सुधारलेली तर एका बाजूला दाट रान आणि डोंगराळ भाग. या दाट रानात घडणाऱ्या काही गोष्टी, हे त्या सभोवताली राहणाऱ्या लोकांनाच ठाऊक आहे. रात्रीच्या सुमारास येथे असणारी भयाण शांतता आणि काही अदृश्य शक्तींचा वावर, या जागेला अतिशय विराण बनवून टाकते. येथील स्थानिक लोकं या जागेला मफतलाल कॉलनी म्हणून ओळखतात. दिवसा येथे मानवी वर्दळअसतेच. पण रात्री इथे जास्त कुणी फिरकत नसतं. याचे कारण एका कथेतून जाऊन घेऊयात.
साहिल कुरेशी नावाचा रिक्षाचालक कळव्यात राहतो. कळव्यात तसे पेट्रोल पंप नाही. येथील लोकांना त्यांच्या गाडीमध्ये इंधन भरण्यासाठी नवी मुंबईतील दिघा शहरात जावे लागत. पेट्रोल पंप तसेच CNG स्टेशन नसल्याने येथील स्थानिकांचे, मुख्यतः रिक्षाचालकांचे फार हाल होत. साहिल त्याच्या रिक्षामध्ये CNG भरण्यासाठी पहाटेच्या ३ वाजता या दाट रानातून प्रवास करत असे. यावेळीला या रस्त्याला फार कुणी भटकत नसत. साहिल दररोज त्या वेळेला CNG भरण्यासाठी या वाटेतून जात. दररोजचा प्रवास त्यामुळे त्याला सवय झाल्याने भीती फार वाटत नव्हती, पण एक भयाण रात्र त्याच्या नशीबात लिहली होती. त्या रात्री नेहमीप्रमाणे पहाटेच्या ३ वाजता साहिल त्याच्या रिक्षाने या वाटेवरून CNG भरण्यासाठी जात होता. पाहावे तिकडे दाट अंधार होता. रस्त्यावर त्याच्याखेरीज दुसरं कुणीच नव्हतं.
अचानक, दूरवर साहिलला पांढऱ्या रंगाची एक आकृती दिसते. साहिल रिक्षा काही थांबवत नाही. ती आकृती हळू हळू जवळ येत असते. पांढऱ्या रंगाची साडी घालून एक वृद्ध महिला, खांदयावर गाठोडे घेऊन त्या रानात वाटेच्या कडेला उभी असते. तिला पाहून साहिल रिक्षा थांबवतो. म्हातारी फार थकलेली असते. साहिल त्या म्हातारीला प्रश्न करतो,”अहो, आजीबाई… एवढ्या रात्री या रानात काय करताय? काय काळ-वेळ आहे की नाही?” हे ऐकून थकलेल्या अवस्थेत असणारी म्हातारी त्याला भलतंच उत्तर देते. म्हातारी म्हणते ,”बेटा, मला पुढपर्यंत सोडशील का रे?” तेव्हा साहिल होकार देऊन तिला रिक्षात बसण्यासाठी सांगतो. म्हातारी साहिलला म्हणते की, “आधी तू बाहेर ये, माझं गाठोडं आत रिक्षात घे मग मी आरामात आत बसून घेईल.”
हे ऐकून साहिलच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडतात की, “ही म्हातारी मला बाहेर बोलावत आहे पण तोपर्यंत आत बसून का घेत नाही?” त्याने त्याच्या आजीकडून अनेक भुतांच्या गोष्ट्या ऐकल्या असतात त्यामुळे त्याला त्या वेळेला आजीचे एक म्हणणे आठवते की, “अदृश्य शक्ती लोखंडाकडे येत नाहीत. भूतांपासून वाचण्यासाठी अनेक लोकं लोखंडाचे खिळे खिशात ठेवतात.” तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये दिवा पेटतो की ‘ही म्हातारी का म्हणून रिक्षामध्ये बसत नाही आहे आणि मला बाहेर काढतेय?” या विचारात गुंग असताना साहिलचे लक्ष त्या म्हातारीच्या पायाजवळ जाते. साहिल पाहतो तर काय? म्हातारीचे पाय उलटे! साहिल तसाच रिक्षा सुसाट पळवत सुटतो. रिक्षा पळवत असताना साहिलचे लक्ष Side Mirror वर जाते आणि पाहतो तर काय? ती थकलेली म्हातारी ते इतके जड दिसणारे गाठोडे अगदी कापसाप्रमाणे हलक्या हाताने खांद्यावर घेत, रिक्षाच्या मागे वाऱ्याच्या वेगाने पळत येत आहे.
हे हृदयात धडकी भरवणारे दृश्य पाहून साहिल डगमगून जातो तरीही तो रिक्षाचा वेग आणखीन वाढवतो. ते रान संपेपर्यंत त्याच्या रिक्षाचा वेग काही कमी होत नाही आणि तो क्षणभरही आरशातून मागे पाहत नाही. रिक्षा कळवा स्थानकावर पोहचताच तो सुखाचा श्वास घेतो. सूर्यप्रकाशाचा पहिला किरण पडेपर्यंत साहिल माघारी घरी जात नाही.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)