फोटो सौजन्य - Social Media
कधी कधी काही अदृश्य शक्ती आपल्या जीवाशी खेळतात तर काही अदृश्य शक्ती आपल्या जीवाला वाचण्याचे काम करतात. कोकणात असे बरचसे किस्से कानावर येतात, जेव्हा एखादी अदृश्य शक्ती आपले रक्षण करण्यासाठी स्वतः धावून येते. आपल्याला इशारा देते आणि तेथून लवकरात लवकर निघण्याचे आदेश देते. जो ऐकतो तो वाचतो, जो नाही ऐकत तो कायमचा हरपून जातो.
ही अदृश्य शक्ती म्हणजे कोकणातला राखणदार! राखणदार फक्त कोकणात नसून तो घाटमाथ्यावर ही पाहायला मिळतो. अशीच काही घटना मंडणगड परिसरात घडली होती. सुदेश आणि सुबोध, दोन्ही भाऊ पहाटे 4 च्या सुमारसच गड सैर करण्यासाठी निघाले होते. त्यांना गडावरून सूर्योदय अनुभवायचा होता. त्या क्षणांसाठी ते इतके आतुरले होते की पहाटे साडे 5 वाजता निघायचे ठरवले असूनही दीड तासांगोदर त्यांनी प्रवास सुरू केला. त्यांचे गाव तसे किल्ल्यापासून फार काही दूर नव्हते. तासाभरातच ते किल्ल्याच्या पायथ्याजवळ असणाऱ्या एका गावात येऊन पोहचले. ST स्टँडवर जेव्हा ते उतरले तेव्हा घड्याळात 5 वाजले होते. आसपासचा परिसर इतका शांत होता की रस्त्यावर एक श्वान आणि मांजरही दिसत नव्हती.
सुदेश आणि सुबोधने गडाकडे जाणाऱ्या वाटेवर चालायला सुरुवात केली. 15 मिनिटे चालल्यानंतर अचानक त्यांच्या शेजारून कुत्र्यांचा घोळका चालू लागला. एका दिशेने यांच्या पावलावर पाऊल ठेवत ते श्वान चालत होते. श्वान असे चालत होते जणू की त्यांना चावी लावली आहे आणि ते कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालत आहेत. ते दृश्य पाहून दोघांना भीती तर वाटलीच पण ते श्वान त्या दोघांना काहीच करत नव्हते, फक्त त्यांच्या जोडीला चालत होते. इतक्यात सुदेशची नजर सुबोधवर गेली. सुबोधाच्या शेजारून एक दिव्य प्रकाश चालत होता.
एका वृद्ध माणसाची आकृती त्या प्रकाशात भासत होती. हातात काठी, जणू घोंगडी ओढलेला आणि डोक्यावर काहीतरी बांधलेला, असा तो भास त्याला दिसून येत होता. त्याला सुरुवातीला जणू भास वाटावा, पण आणखीन काही 15 मिनिटे उलटली पण ती आकृती तशीच त्यांच्याबरोबर चालत आहे. सुदेशला त्यांच्याबरोबर काय घडतंय? सुबोधाच्या शेजारून काय चालतंय? याची जाणीव झाली होती. आईच्या तोंडून अशा अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या. दूरवरच सुदेशला मंडणगडाचा बोर्ड दिसला. चढाई सुरू होतंच होती. तितक्यात त्यांच्याबरोबर असलेले श्वान अचानक गायब झाले. सुबोधाच्या शेजारून चालणारी ती दिव्य आकृतीही क्षणार्धात नाहीशी झाली.
सुदेश आणि सुबोध घाबरून गेले. पण तेव्हा सुदेश मोठा असल्याने त्याने सुबोधाला धीर दिला. त्याने त्याला सांगितले की “घाबरू नकोस! ते राखणदार आहेत. आपले संरक्षण करण्यासाठी आले होते.” त्या स्थळाला नमन करत आणि त्या राखणदाराचे आभार मानत दोघे ही किल्ल्याच्या टोकाकडे मार्गस्थ झाले. मुळात, राखणदार त्यांना वरती जाण्यापासून रोखण्यासाठी आला होता पण या दोघांना त्या गोष्टी कळल्या नाहीत. त्यांना वाटले की त्याने यांना दर्शन दिले. पण राखणदार सावध करण्यासाठी येत असतो, हे त्यांना उमजले नाही. शेवटी, किल्ल्याच्या मध्यभागी पोहचताच. सुदेशने खाली पाहिले तर किल्ल्याच्या सुरुवातीला (मंडणगड बोर्डाच्या येथे) तीच दिव्य आकृती चमकताना दिसली, जणू ती त्यांच्याकडेच पाहत आहे.
सुदेशच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्याला त्याच्या आईने सांगितलेल्या सर्व कथा आठवल्या. पायथ्याशी असलेली ती प्रकाशझोत वेगाने किल्ल्याच्या उजव्या दिशेने धावू लागली. ते पाहून सुदेशही त्या दिशेने धावू लागला. सुदेशला पाहून मागे असणारा सुबोधही सुदेशच्या मागे धावू लागला. जसा सुबोध पुढे सरकला. तशीच त्या ठिकाणची जमीन सरकू लागली. होय! तिथे दरड कोसळली. त्या कर्कश्श आवाजाने, सुदेशचे लक्ष वेधले. सुदेशला लक्षात आले की तिथे त्याचा भाऊ होता. पण त्याने जसे मागे पाहिले सुबोध त्या दरडीतून बचावला होता. कारण तो वेळेच आपल्या भावाला धावताना पाहून त्याचे मागे धावू लागला आणि ज्या ठिकाणी तो उभा होता तेथे सरकणाऱ्या दरडीतून वाचला. सुदेशचे लक्ष पुन्हा डोंगराच्या खाली गेले पण त्या ठिकाणाहून ती दिव्य आकृती गायब झाली होती. असे म्हणतात राखणदार जरी आपले रक्षण करत असला तरी त्याची एक हद्द असते, त्या हद्दीच्या बाहेर तो कधीच जात नाही. पण या राखणदाराने आपल्या हद्दीत राहून त्या दोघांच्या प्राणांचे रक्षण केले. जर सुदेशला डोंगरावरून राखणदार परत दिसला नसता तर कदाचित घडणारे दृश्य काही वेगळे आणि भयानक असते.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर
हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)