प्रमोशन मिळविण्यासाठी ७ सिक्रेट टिप्स (फोटो सौजन्य - iStock)
प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कारकिर्दीत प्रगती करायची असते आणि त्याला लवकरात लवकर पदोन्नतीची अर्थात प्रमोशनची संधी मिळावी असे वाटते. पण फक्त कठोर परिश्रम करणे यासाठी नक्कीच पुरेसे नाही, हुशारीने काम करणे आणि तुमच्या बॉसला प्रभावित करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. याचा अर्थ तुम्ही सतत चापलुसी करावे अथवा बॉसच्या पुढेमागे करावे असं नाही.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत असाल आणि कठोर परिश्रम करूनही कोणताही महत्त्वाचा बदल होत नसेल, तर तुम्हाला तुमच्या रणनीतीत काही बदल करावे लागतील. योग्य दृष्टिकोन, व्यावसायिक वर्तन आणि काही खास सूत्रे स्वीकारून तुम्ही तुमच्या बॉसचा विश्वास जिंकू शकता आणि तुमच्या बढतीचा मार्ग सोपा करू शकता. यासाठी रिलेशनशिप सल्लागार अजित भिडे यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते प्रमोशन मिळविण्यासाठी, केवळ तुमची हुशारी नाही तर तुमच्यातील क्षमता योग्य पद्धतीने सादर करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे काम करण्याचे कौशल्य नक्की कसे आहे अथवा तुमच्या टीममधील तुमचे योगदान आणि बॉसशी तुमचा संबंध वा समन्वय कशा प्रकारे आहे या सर्व गोष्टी प्रमोशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. तर जर तुम्हालाही तुमच्या मेहनतीचे योग्य फळ हवे असेल, तर ते ७ सिक्रेट्स जाणून घ्या, जे तुम्हाला तुमच्या बॉसचे नक्कीच फेव्हरेट्स बनवतील आणि बढतीच्या शर्यतीत आघाडीवर घेऊन जातील!
काम वेळेत पूर्ण करणे
कोणत्याही बॉसला असे कर्मचारी आवडतात जे त्यांचे काम वेळेवर पूर्ण करतात. जर तुम्ही तुमचे काम निर्धारित वेळेत दर्जेदार स्वरूपात पूर्ण केले तर त्याचा तुमच्या बॉसवर सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या कामात नेहमी प्रामाणिकपणा आणि वक्तशीरपणा ठेवा. तसंच उगाच पुढेपुढे करू नका. तुमचे काम दर्जात्मक ठेवा तेच तुम्हाला पुढे प्रगतीकडे घेऊन जाईल. बॉसच्या नजरेच चांगुलपणा दाखविण्याठी वाट्टेल त्या थराला न जाता कामाकडे अधिक लक्ष द्या
नवी कौशल्य शिका
आजच्या काळात तंत्रज्ञान आणि उद्योग सतत बदलत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमचे कौशल्य अद्ययावत ठेवले अर्थात अपडेट ठेवले तर बॉसला वाटेल की तुम्ही कंपनीसाठी एक महत्त्वाच्या व्यक्ती आहात. तुमचे कौशल्य हे कंपनीच्या फायद्यासाठी असेल तर नक्कीच बॉसवर तुमचे इंप्रेशन चांगले ठरते हे विसरू नका. डिजिटल मार्केटिंग, डेटा अॅनालिटिक्स, नेतृत्व कौशल्ये इत्यादी नवीन गोष्टी शिका आणि स्वतःला नियमित अपडेट ठेवा
नव्या आयडियांसाठी पुढाकार घ्या
जर तुम्हाला तुमच्या बॉसने तुमच्यावर विश्वास ठेवावा असे वाटत असेल, तर फक्त तुम्हाला दिलेल्या कामापुरते मर्यादित राहू नका. ऑफिसमध्ये नवीन कल्पना द्या, प्रकल्पांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हा आणि समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. सक्रिय कर्मचारी नेहमीच बॉसच्या नजरेत राहतात. तसंच दिलेल्या वेळेतच काम करून पळून जाणे हा पर्याय असू शकत नाही. बॉसने दिलेल्या कामात आपला वेगळा टच आणि क्रिएटिव्हपणा आणण्याचा नियमित प्रयत्न असू द्या
संवाद कौशल्य सुधारा
चांगले संवाद कौशल्य हे एक मोठे बलस्थान आहे. तुमचे विचार स्पष्ट आणि आत्मविश्वासाने सांगा. एखादी गोष्ट कंपनीच्या कशी फायद्याची आहे हे योग्यरित्या बॉसशी संवादपूर्णरित्या समजावून सांगितले तर नक्कीच तुम्ही सरस ठरता. बॉसशी वैयक्तिकरित्या बोला आणि टीमशी समन्वय साधून काम करा. यामुळे तुमचे नेतृत्वगुणदेखील सुधारतात.
डायबिटीसचा सर्वात स्वस्त उपाय सापडला, 10 रूपयांच्या भाजीचा कुटून काढा रस, 50% होईल शुगर कमी
टीम प्लेअर व्हा
आपल्या टीमसह उत्तम मेळ साधा. कोणाशीही वाद घालू नका. मतभेद असू शकतात, मात्र ते चांगल्या पातळीवर सोडवा आणि कोणाच्याही पोटावर पाय येईल असं वागू नका. स्वतःला सिद्ध करताना इतरांना खाली ओढू नका तर आपल्या सोबतीने त्यांनाही एकत्र घेऊन चला. आपण कोणाचेही नुकसान करत नाही हे कायम लक्षात ठेवा आणि इतरांनाही त्याचप्रमाणे धडा द्या. स्वतःला काहीतरी मिळवायचे आहे म्हणून दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन प्रगतीकडे जाऊ नका, यामुळे पुढे आयुष्यात नुकसान होऊ शकते हे लक्षात घ्या
बॉसचा अभिप्राय सकारात्मक घ्या
जर तुमचा बॉस तुम्हाला अभिप्राय देत असेल तर त्याला टीका म्हणून घेऊ नका. हे शिकण्याची आणि तुमचे काम सुधारण्याची संधी म्हणून तुम्ही विचार करा. जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला फिडबॅक देत असतो तेव्हा त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा. जेव्हा तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता आणि पुढे जाता तेव्हा ते बॉसला प्रभावित करते आणि तुमच्याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन अधिक चांगला होतो.
नेहमी विनम्र रहा
तुमच्या बॉसशी बोलताना नम्र राहा. कितीही तणावपूर्ण परिस्थिती असली तरी, प्रत्येक परिस्थितीत व्यावसायिक राहा. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सभ्य वर्तन तुम्हाला तुमच्या बॉसचे आवडते बनवू शकते. कितीही राग आला तरीही विचारपूर्वक निर्णय घ्या आणि आरडाओरडा वा तणतण न करता योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली तर बॉसलादेखील तुमचा विचार करणे भाग पडते हे लक्षात ठेवा. तुमच्या कामात कमतरता नसेल तर तुमचे प्रमोशन हे नक्की आहे.
प्रमोशन मिळवणे सोपे नाही, परंतु जर तुम्ही हे ७ सिक्रेट सूत्रे पाळली तर तुमच्या बॉसचे मन जिंकण्यास वेळ लागणार नाही. कामात हुसारी, सक्रिय दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत उंचीवर घेऊन जाऊ शकतात.