मुंबईच्या लोकांना काय कळणार कोकणातील शिमग्याची मजा! पालखीचा नाद अन् शंकासुराची भिती, अनोखा असतो उत्सवाचा थाट
भारतात 13 मार्च रोजी होलिका दहन आणि 14 मार्च रोजी रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. भारतातील अनेक भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरात राहणारी लोक एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी करतात. पण होळी म्हटलं तर फक्त होलिका दहन आणि रंगपंचमी एवढेच आहे का? तर नाही. होळी खेळण्याची खरी मजा तर कोकणात येते. शहरातील लोकांना काय समजणार कोकणातील शिमग्याची मजा, असं बोलतात ते काही खोटं नाही.
महाराष्ट्रातील कोकण भागात, होळीला “कोकणातील शिमगा” असे म्हणतात. हा एक उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध सण आहे जो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोव्याच्या काही भागात साजरा केला जातो. दहा ते पंधरा दिवसांच्या या उत्सवात होलिका दहन, रंगपंचमी आणि पालखी उत्सव यासारख्या परंपरांचा समावेश आहे. गणपती नंतर होळी हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे आणि हा उत्सव सुमारे पंधरा दिवस विविध पारंपारिक विधींसह साजरा केला जातो. (फोटो सौजन्य – Instagram)
हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या पाचव्या दिवशी होलिक दहन केलं जातं जिथे आजूबाजूच्या पाच गावातील गावकरी गावाच्या मैदानावर आयोजित या उत्सवात सामील होतात. कोकणातील होळीचे प्रमुख आकर्षण म्हणजे संकासूर आणि पालखी. संकासूराच्या वेशात पेटलेल्या होळीच्या पाच फेऱ्या मारणारा आणि आगीतून धावणारा एक माणूस कोकणातील शिमग्याचे एक प्रमुख आकर्षण आहे. कोकणातील होळी उत्सवादरम्यान समाज आणि स्थानिक मंदिराच्या कल्याणासाठी देणग्या गोळा करण्यासाठी लोक ‘संकासूर’सारखे कपडे घालतात. ही कोकणातील पिढ्यानपिढ्या सुरु असलेली परंपरा आहे.
कोकणातील शिमगा म्हणजे 10 दिवसाआधीपासून सुरू होणारे होलिका दहन आणि त्यानंतर होम आणि पालखीची मजा. पालखी खांद्यावर घेऊन नाचण्याची मजा फक्त कोकणातच येते. खरं तर कोकणात होळीला एक वेगळाच उत्साह असतो. मुंबईतील चाकरमानी पालखीच स्वागत करण्यासाठी कोकणात जातात. सहा सहा महिने बंद असणारी घर होळीच्या निमित्ताने पुन्हा उघडली जातात. गावातील ओसाड शांतता आनंदी वातावरणात बदलते. अहो कोकणातील शिमग्याची गोष्टच वेगळी आहे.
शिमग्याला पालखी खांद्यावर घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद आणि उत्साह दिसतो तो कोणत्याही मौल्यवान दागिन्याशिवाय कमी नाही. कोकणातील शिमगा पाहण्यासाठी अगदी दुरून लोक कोकणात येतात. शिमग्याच्या निमित्तानं वर्षभर न भेटलेली मंडळी पुन्हा एकत्र येतात. एकमेकांना मिठी मारून होळीच्या शुभेच्छा देतात. होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पालखी चाकरमान्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या घरी जाते. शिमग्याला कोकणातील माणसं गावी जातात कारण त्यांचा देव त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या घरी येतो. रात्री ज्या चारमान्याच्या घरी पालखी वस्तीला असेल त्या घरी सर्व गावकरी जमतात आणि रात्रभर मजा मस्ती करत भजन म्हणतात.
होळीचा सण म्हणजे केवळ रंग खेळणे किंवा गुलाल उधळणे एवढंच नसत, तर कोकणात जाऊन मानाची पालखी खांद्यावर घेऊन नाचावणं यात देखील एक वेगळाच आनंद असतो. कोकणातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडीची मनाची पालखी असते. प्रत्येकजण त्यांच्या वेगळ्या अंदाजात आणि तालासुरात पालखी नाचवण्याचा आनंद घेतो. आणि अशा प्रकारे साजरा केला जातो कोकणातील शिमगा.