समोरचा व्यक्ती आहे तद्दन 'खोटारडा'
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणस असतात. त्यातील काही निवडक माणसच आपली असतात. प्रत्येक ठिकाणी खोट्या माणसांचा सामना करावा लागतो. एक खोटं बोलल्यानंतर अजूनही कितीतरी वेळा खोटंच बोलावं लागत. अशी काही माणसं असतात, जी खूप आत्मविश्वासाने खोटं बोलतात. त्यांनी बोललेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवला जातो. बऱ्याचदा समोरची व्यक्ती आपल्यासोबत नेमकं खरं बोलते की खोटं बोलते हे ओळखणे अतिशय कठीण होऊन जाते. मात्र त्यांच्या शारीरिक हालचाली आणि तोंडावर दिसून येणारे मनातले हावभाव पाहून तुम्ही लगेच समोरची व्यक्ती खरं बोलते की खोटं हे ओळखू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खोटं बोलणारी व्यक्ती ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्समुळे तुम्ही क्षणार्धात खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला ओळखू शकता.(फोटो सौजन्य – istock)
खोटं बोलणारी व्यक्ती कधीच नजरेला नजर देत नाही. आपले डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. त्यामुळे खोटं बोलणारी व्यक्ती कधीही नजरेला नजर लावून बोलत नाही. त्यांचे डोळे कायमच खाली झुकलेले असतात. खोटं बोलणारा माणूस तुमच्याकडे बघणे टाळतो. पण एखादी व्यक्ती कोणतीही गोष्टी खरी सांगत असेल तर ती व्यक्ती पोटतिडकीने तुमच्याकडे बघून बोलत असते. यामध्ये कोणताही बनावटपणा नसतो.
खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनात कायमच भीती असते. त्यामुळे ते अतिशय अस्वस्थ वाटतात. पाय हलवणे, बोटांनी खेळ करणे, सारखा केसांना हात लावणे इत्यादी सर्व क्रिया अस्वस्थपणा वाढू लागल्यानंतर केल्या जातात. त्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्यासोबत बोलताना असे हावभाव व्यक्त करत असेल तर ती व्यक्ती तुमच्यापासून काहींना काही लपवत आहे.
खोटं बोलणारी व्यक्ती एखादी गोष्ट सांगताना कायमच घाबरलेली आणि खूप जास्त अस्वथ वाटते. खोटं बोलताना गोष्टी अशा काही पटवून दिल्या जातात की त्या सर्व खऱ्याच आहेत. अनेक अनावश्यक आणि अतिरिक्त तपशील कोणत्याही कारणाशिवाय सांगितला जातो. त्यामुळे आपण खरं बोलतोय हे सांगण्यासाठी अनेक गोष्टी पटवून द्याव्या लागतात.
खोटं बोलणारी व्यक्ती विचारलेल्या प्रश्नाचे लवकर उत्तर देत नाही. कोणत्याही गोष्टीची उत्तर देण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. पण प्रामाणिक लोक कोणत्याही गोष्टीचा लगेच प्रतिसाद देतात. खोट्या गोष्टी पटवून देण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लवकर देता येत नाही. समोरची व्यक्ती दिलखुलासपणे तुमच्यासोबत बसून हसत असेल तर त्यांच्या नजरेत समाधानाची, आनंदाची भावना लगेच दिसून येते.