House Painting Rules for Tenants (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) House Painting Rules for Tenants (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दसरा दिवाळी जवळ आली की सगळ्यांची घराची साफसफाई सुरू होते. सगळं घर स्वच्छ करणं, नवीन पडदे लावणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराला रंग देणं. घर रंगवलं की घर एकदम नवीन वाटतं.पण तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर हाच रंग देण्याचा विषय डोक्याला ताप होतो. घराला कलर कोण करणार? मालक करणार की आपण करायचा? यावरूनच बऱ्याच वेळा मालक आणि भाडेकरूमध्ये खटके उडतात. मालक म्हणतो तू राहतोस तू कर, भाडेकरू म्हणतो तुमचं घर तुम्ही करा. तर यावर नक्की कायदा काय सांगतो? House Painting Rules for Tenants:
तुम्ही घर भाड्याने घेताना एक अॅग्रीमेंट बनवले असेल. त्या कागदावर सगळं लिहिलेलं असतं. तो कागद नीट वाचणे खूप गरजेचं आहे.जर त्या अॅग्रीमेंटमध्ये असं लिहिलं असेल की “दरवर्षी किंवा घर खाली करताना भाडेकरूने रंग करून द्यावा”, तर मग तुम्हाला काही पर्याय नाही. तुम्हालाच तुमच्या खिशातून पैसे टाकून रंग करावा लागेल.पण जर अॅग्रीमेंटमध्ये रंगाबद्दल काहीच लिहिलं नसेल, तर मग कायदा सांगतो की घराला रंग देणं, व्हाईट वॉश करणं, दार-खिडक्यांना रंग मारणं हा सगळा खर्च घरमालकाचा असतो भाडेकरुचा नाही.
तुम्ही घरात 2-3 वर्ष राहिलात की भिंतीचा रंग आपोआप जातो. कधी कधी ओलावा येतो, कधी पिवळा पडतो याला नैसर्गिक झीज म्हणतात.अशावेळी जर तुम्हाला वाटतं की दिवाळीसाठी घर छान दिसावं म्हणून पेंट करावं, तर त्याचा खर्च मालकाने करायचा असतो. कारण घर जुनं होणं ही तुमची चूक नाही.पण जर तुम्ही भिंतीवर खिळे ठोकून-ठोकून भिंत फोडली असेल, लहान मुलांनी सगळ्या भिंतीवर पेन्सिलने चित्र काढली असतील तर मग मात्र तो खर्च तुम्हालाच द्यावा लागेल. तुमच्या चुकीमुळे भिंत खराब झाली तर मालक पैसे देणार नाही.
भाडेकरू हा भाडेकरू असतो, मालक हा मालक असतो, घर बळकावता येणार नाही …
दसरा दिवाळीसाठी फक्त घर सुंदर दिसावं म्हणून रंग करायचा असेल तर उगाच स्वतःच्या खिशातून पैसे घालू नका. सोपं काम करा. सगळ्यात आधी मालकाशी शांतपणे बोला. त्यांना सांगा की अॅग्रीमेंटमध्ये रंगाबद्दल काही लिहिलेलं नाही, त्यामुळे नियमाप्रमाणे तुम्ही खर्च करा. बऱ्याच वेळा बोलूनच विषय संपतो. जर मालक ऐकत नसेल तर त्यांना अॅग्रीमेंट दाखवा. त्यात काय लिहिलंय ते बघा. जर त्यात अट नसेल तर तुम्ही ठाम राहू शकता. एक महत्वाची गोष्ट, नवीन घर घेतानाच अॅग्रीमेंटमध्ये पेंटिंगबद्दल स्पष्ट लिहून घ्या. म्हणजे नंतर वादच होणार नाही. कोण रंग करणार, किती वर्षांनी करणार, हे आधीच ठरवून टाका.






