
आजच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. आपल्या घरात देवघर किंवा देवाचे फोटो असणे ही आपली संस्कृती आहे, पण जुने, फुटलेले किंवा खराब झालेले देव, मूर्ती आणि धार्मिक वस्तू कुठे विसर्जन कराव्यात, हा एक मोठा प्रश्न असतो. आणि याची वाईट परिस्थिती म्हणजे बहुतांश लोक या वस्तू सरळ नदीत किंवा पानस्त्रोत ठिकाणी वाहून देतात. आणि परिणामी नद्यांचे, ओढ्यांचे भयंकर प्रदूषण होते. याच समस्येवर मार्ग काढण्यासाठी अडव्होकेट तृप्ती श्रीकांत गायकवाड यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये ‘संपूर्णम सेवा फाऊंडेशन’ ची स्थापना केली. महाराष्ट्रातील नाशिक येथे २०१९ मध्ये झालेल्या महापूर आणि गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्याचा अभ्यास केल्यानंतर, फाऊंडेशनच्या संस्थापक तृप्ती गायकवाड यांनी या दिशेने पावले उचलली आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता धार्मिक वस्तूंचे व्यवस्थापन आणि त्याचे रिसायकलिंग करण्याचे ‘पुण्याचे’ कार्य सुरू केले.
संस्थेचे ध्येय आणि दूरदृष्टी
संपूर्ण सेवा फाऊंडेशनचे मुख्य ध्येय धार्मिक भावनांचा अनादर न करता पर्यावरण पूर्णपणे स्वच्छ ठेवणे हे आहे. जुन्या किंवा वापरलेल्या मूर्ती व फोटो झाडांखाली किंवा कचऱ्यात फेकून देण्याची पद्धत नष्ट करणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या फाऊंडेशनतर्फे जुन्या धार्मिक मूर्ती, फोटो, धातू, लाकूड, प्लास्टिक, पुस्तके आणि कपडे गोळा करून योग्य पद्धतीने ‘उत्तर पूजा’ केली जाते. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कागद, मूर्ती आणि लाकडाचे योग्य प्रकारे Recycling & Upcycling केले जाते. या माध्यमातून घरातील टाकाऊ वस्तूंपासून सुंदर होम डेकोर आणि उपयोगी वस्तू बनवल्या जातात. तसेच, महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करण्याचे मोठे कार्यही फाऊंडेशन अंतर्गत महिला सबलीकरणाच्या माध्यमातून केले जात आहे.
Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांनी घ्यायची काळजी
सध्या गणेशोत्सवाचा सण जवळ येत आहे. या काळात आपण अनेक मूर्ती, सजावटीचे साहित्य आणि धार्मिक वस्तू वापरतो. गणेशोत्सवा नंतर किंवा वर्षभरात जुन्या झालेल्या मूर्तींचे व फोटोंचे विसर्जन करताना आपण खालीलप्रमाणे योग्य पावले उचलली पाहिजेत,
विलगीनीकरण: जुन्या मूर्ती किंवा फोटो कचऱ्यात वा झाडांखाली बेवारसपणे फेकून देऊ नका, कारण यामुळे धार्मिक भावना दुखावतात आणि प्रदूषण वाढते, पर्यावरणास हानी पोहोचते.
संस्थांची मदत घ्या: अशा वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी संपूर्ण सेवा फाऊंडेशनसारख्या संस्थांशी संपर्क साधा, जेणेकरून त्यांचे योग्य रिसायकलिंग होऊ शकेल.
शाश्वत पर्यायांचा वापर: गणेशोत्सवात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करा आणि निर्माल्य किंवा पूजेचे साहित्य थेट जलस्रोतांमध्ये टाकून जलप्रदूषण करणे टाळा.
जनजागरूकता
लोकांमध्ये आपल्या श्रद्धेचा वध न करता पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, याविषयी जनजागरूकता निर्माण करणे सर्वात जास्त गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देवांच्या फोटोंचे व स्टिकर्सचे अपसायकलिंग करणे आणि लॅमिनेटेड फ्रेम्सचा पुनर्वापर करणे याविषयी संस्थेने समाजात मोठा संदेश दिला आहे.