
Sore Throat Home Remedies (फोटो- सोशलमीडिया)
थंडी-गरम असं वातावरण बदललं की सगळ्यात आधी परिणाम होतो तो घशावर कधी घशात खवखव होते, कधी टॉन्सिल्स सुजतात तर कधी एवढा घसा दुखतो की थुंकी गिळणं पण कठीण होतं. व्हायरल इन्फेक्शन, सर्दी-खोकला, धूळ, अॅलर्जी किंवा फक्त ऋतू बदलला तरी घसा दुखायला लागतो. घसा दुखायला लागला की जेवण जात नाही, बोलता येत नाही, दिवसभर किरकिर होते. लगेच मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणण्यापेक्षा आधी घरचे काही सोपे उपाय करून बघा. हे उपाय आजीच्या काळापासून चालत आले आहेत आणि खरंच आराम देतात.
घसा दुखत असेल तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गुळण्या करणे. एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यामध्ये अर्धा चमच्या मीठ टाका, मात्र हे पाणी जास्त गरम नको, कोमटच ठेवा. या पाण्याने दिवसांतून 2-3 वेळा गुळण्या करा. त्याने घशातील सूज लगेच कमी होईल तसेच बॅक्टेरिया असतात ते देखील मरतात. घशाला आराम मिळतो. हा उपाय आपण लहान मुलांना देखील करु शकतो. Sore Throat Home Remedies:
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. घसा दुखत असेल तर एक चमचा मध तसाच खा. तो हळूहळू घशातून जाऊ द्या. मध घशावर एक पातळ थर तयार करतो ज्यामुळे जळजळ कमी होते. तुम्हाला तसाच मध खायचा नसेल तर कोमट पाण्यात किंवा आल्याच्या चहात एक चमचा मध टाकून प्या. पण लक्षात ठेवा, मध कधीच गरम पाण्यात टाकू नका, कोमट पाण्यात टाका. लहान मुलांना हा उपाय गुणकारी आहे.
घसा दुखत असताना बऱ्याच लोकांना पाणी प्यायचा कंटाळा येतो कारण गिळताना त्रास होतो. पण पाणी कमी प्यायलं तर घसा अजून कोरडा पडतो आणि दुखणं वाढतं.त्यामुळे दिवसभर कोमट पाणी पित रहा. थंड पाणी अजिबात पिऊ नका. आल्याचा चहा, तुळशीचा चहा, गरम सूप प्या. यामुळे घशाला शेक मिळतो आणि शरीरात पाणी पण टिकून राहतं. गरम सूप प्यायल्याने घशातला चिकटा पण निघून जातो.
वाफ घेणं फक्त सर्दीसाठी नाही तर घशासाठी पण उपयोगी आहे. एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्याची वाफ घ्या. दिवसातून एक किंवा दोन वेळा 5 ते 10 मिनिट वाफ घेतली तर घशात ओलावा राहतो. वाफेमुळे घशातली जळजळ कमी होते आणि जर कफ अडकला असेल तर तो मोकळा होतो. वाफ घेताना डोक्यावर टॉवेल घ्या म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही.
लवंग घशासाठी खूप चांगली असते. लवंगामध्ये वेदना कमी करण्याचे गुण असतात. एक कप पाणी घ्या, त्यात 2 ते 3 लवंगा टाका आणि चांगलं उकळून घ्या. पाणी अर्ध झालं की गॅस बंद करा. ते थोडं कोमट होऊ द्या आणि मग त्यात एक चमचा मध टाका. हा चहा दिवसातून दोन वेळा प्या. घशातली खवखव आणि वेदना दोन्ही कमी होतील.लक्षात ठेवा या गोष्टीया उपायांनी 2-3 दिवसात आराम नाही आला, ताप आला किंवा घशातून रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरकडे जा. घरगुती उपाय हे सुरुवातीच्या त्रासासाठी आहेत. थंड पाणी, आईस्क्रीम, जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ घसा दुखत असताना टाळा. आणि सगळ्यात महत्वाचं, आवाजाला जास्त ताण देऊ नका, कमी बोला.वातावरण बदलतंय, काळजी घ्या.