पायांमध्ये सूज आणि वेदना आहे? मग हे असू शकते या 5 पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण; वेळीच सावध व्हा
वय वाढू लागले की आरोग्याच्या समस्याही वाढू लागतात. अशात शरीराचे दुखणे एक सामान्य गोष्ट आहे. पण आजच्या काळात तरुणांनाही ही समस्या कमी वयातच उद्भवू लागली आहे. अनेकदा थकून आल्यावर आपले पाय दुखू लागतात अथवा पायांना सूज येते. सतत असे घडत असेल तर ते गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला आरोग्यसाठी घातक ठरू शकते. हे जास्त चालण्यामुळे, बसण्यामुळे किंवा उभे राहिल्याने किंवा दुखापतीमुळे देखील होऊ शकते, पण पायांचे हे दुखणे अधिक काळापर्यंत जाणवत असेल यापासून वेळीच सावध होणे आवश्यक आहे.
अलिकडेच, एका सुप्रसिद्ध आरोग्य तज्ञ श्वेता शाह यांनी लोकांना सांगितले आहे की, जर पाय दुखत असतील, पायांना मुंग्या येत असतील किंवा सूज येत असेल तर हे पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे घडू शकते. आपल्या शरीराला पोषक तत्वांची नितांत गरज असते, योग्य आहारातून हे पोषक घटक आपल्या शरीराला मिळत असतात. आरोग्याच्या अनेक समस्या या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे जाणवत असतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
पायांच्या खालच्या बाजूस वेदना
जर तुमच्या पायात वेदना होत असतील तर ते कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
मांड्यांमध्ये होणाऱ्या वेदना
जर पायांच्या मांड्यांमध्ये अचानक वेदना जाणवत असतील तर हे इलेक्ट्रोलाइट्स (सोडियम आणि पोटॅशियम) आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दर्शवू शकते.
पायांमध्ये मुंग्या येणे
मधुमेही न्यूरोपॅथी किंवा जीवनसत्त्वे B1, B6 आणि B12 च्या कमतरतेमुळे पायांमध्ये मुंग्या येऊ शकतात.
सकाळी उठल्यावर ‘या’ पाण्याचे सेवन सुरु करा; आतड्यांमधील सर्व घाण मुळापासून होईल साफ
सांधेदुखी
याशिवाय, जर गुडघे, घोटे, बोटांमध्ये सांधेदुखीचा त्रास होत असेल तर हे देखील पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. हे असे व्हिटॅमिन डीची कमतरता किंवा युरिक अॅसिड वाढल्यामुळे होऊ शकते.
पायांमध्ये सूज
पायाच्या सूजकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हे यकृताच्या ताणामुळे, मूत्रपिंडाच्या बिघाडामुळे किंवा हृदयाशी संबंधित समस्यांमुळे होऊ शकते. अशा परिस्थितीत, वेळीच डॉक्टरांकडून यावर योग्य ते उपचार आणि सल्ला घेणे गरजेचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.