'या' चुकीच्या सवयींमुळे बिघडते लिव्हरचे कार्य:
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करते. याशिवाय खराब रक्त शुद्ध करण्याचे कार्यसुद्धा लिव्हरचे आहे. मात्र दैनंदिन आयुष्यातील चुकीच्या सवयी लिव्हरचे कार्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकून ऊर्जा साठवण्यास मदत करतो. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर होतो आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू लागते. फॅटी लिव्हरची समस्या उद्भवल्यानंतर लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे, लिव्हरला सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आयुष्यातील कोणत्या सवयी लिव्हरचे कार्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
फक्त दारूच नाही तर 5 पदार्थांनी सडते लिव्हर, होऊ शकतो Fatty Liver चा त्रास; सकाळी काय खावे?
अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हरला सूज येण्याची शक्यता असते. याशिवाय लिव्हर खराब होऊन मृत्यू देखील होऊ शकतो. अल्कोहोल यकृताच्या पेशींना नुकसान पोहोचवते. ज्यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, लिव्हरचा कर्करोग इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दारूचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हरची क्षमता कमी होऊन लिव्हरमध्ये विषारी पदार्थ तसेच साचून राहण्यास सुरुवात होते.
लिव्हरसबंधित आजार होण्यामागे असलेले एकमेव कारण म्हणजे चुकीचा आहार. चुकीचा आणि शरीराला पचन न होणाऱ्या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सतत तळलेले, तेलकट, तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. यासोबतच लिव्हरचे आरोग्य सुद्धा बिघडू लागते. जंक फूडमध्ये ट्रान्स फॅट आणि उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप इत्यादी हानिकारक घटक आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी जंक फूडचे सेवन करावे.
काहींना सतत सिगारेट ओढण्याची सवय असते. नेहमी नेहमी सिगारेट ओढल्यामुळे फुफ्फुसांसोबतच लिव्हरचे कार्य सुद्धा बिघडून जाते. सिगारेटमध्ये असलेले हानिकारक घटक लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात, ज्यामुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हरचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. सतत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना लिव्हरसबंधित आजार लगेच होतात.
पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. पण शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर विषारी पदार्थ लिव्हरमध्ये तसेच साचून राहतात, ज्यामुळे आरोग्य बिघडते. लिव्हरमध्ये विषारी पदार्थ साचून राहिल्यामुळे लिव्हरच्या कार्यात बिघाड होतो.