तोंडात अल्सर कशामुळे येतात
जिभेवर किंवा तोंडामध्ये अल्सर येणे ही सामान्य समस्या आहे. आहारात बदल झाल्यानंतर किंवा पोट स्वच्छ न झाल्यामुळे तोंडामध्ये अल्सर येऊ लागतात. तोंड आल्यानंतर अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. जेवताना किंवा पाणी पिताना तोंडामध्ये जळजळ झाल्यासारखे वाटू लागते. अल्सर प्रामुख्याने तोंडाच्या आत, जिभेवर, गालाच्या आत, ओठांवर किंवा घशामध्ये येतात. अल्सर आलेल्या ठिकाणी लाल झाल्यासारखे आणि सुजल्यासारखे वाटू लागते. मात्र अनेक लोक तोंड आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. तोंडात असलेल्या अल्सरमुळे असह्य वेदना होऊ लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, अवयवांच्या रंगात होतो बदल
तोंड आल्यानंतर बऱ्याचदा ते आपोआप बरे होऊन जाते. काही दिवसांमध्ये तोंडातील फोड पूर्णपणे बरे होऊन त्वचा चांगली राहते. पण अनेकदा वारंवार तोंड आल्यानंतर कोणताही पदार्थ खाताना किंवा बोलताना वेदना होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तोंडात अल्सर येण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आरोग्यासंबंधित कोणत्या समस्या उद्भवल्यानंतर तोंड येते, चला तर जाणून घेऊया.
निरोगी आरोग्यासाठी शरीरात विटामिन असणे आवश्यक आहे. पण शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाली तर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. विटामिन बी 12 , लोह, जस्त आणि फॉलिक ऍसिड सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तोंडात अल्सर येऊ शकतात. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे आहारात पालेभाज्या, फळे, कॅल्शियम युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे वारंवार तोंडात अल्सर येतात.
तोंडात अल्सर कशामुळे येतात
आहारात बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडून जाते. गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता किंवा अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.पचनसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर तोंड येते. शरीरातील विषारी घटक पोटात तसेच साचून राहिल्यामुळे पोट बिघडण्यासोबत तोंड सुद्धा येते. त्यामुळे पोट स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार, पोटाच्या समस्या आणि शरीरात पित्त दोष वाढल्यामुळे तोंडात अल्सर होऊ शकतात.शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये बिघाड झाल्यानंतर तोंडात अल्सर येऊ लागतात.
साथीच्या आजारांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे तोंडात अल्सर येणे. ल्युपस किंवा सेलिआक रोग झाल्यानंतर तोंडात अल्सर होण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार करणे आवश्यक आहे.
शरीरामध्ये मानसिक किंवा शारीरिक तणाव वाढल्यानंतर तोंडात अल्सर येऊ लागतात. चिंता तणाव वाढल्यामुळे शरीरात झोपेची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडू लागते. तणाव वाढल्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते. याशिवाय, तणावामुळे शरीरात जळजळ वाढते, ज्यामुळे तोंडात अल्सर होण्याची शक्यता असते.