फोटो सौैजन्य - Social Media
कर्करोग ही एक गंभीर समस्या आहे, जी संपूर्ण जगभर कोणालाही होऊ शकते. या धोकादायक आजाराचे अनेक प्रकार असतात, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना प्रभावित करतात आणि त्यामुळे त्यांना त्या भागांच्या नावाने ओळखले जाते. स्किन कॅन्सर हा त्यातीलच एक प्रकार आहे, ज्याची लक्षणे ओळखण्यात अनेकदा लोक उशीर करतात. त्यामुळे आज आपण या लेखात स्किन कॅन्सरची काही सुरुवातीची लक्षणे जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही वेळेत त्याची दखल घेऊ शकाल.
स्किन कॅन्सर म्हणजे काय?
जेव्हा त्वचेतील पेशी अनियमितपणे आणि वेगाने वाढू लागतात, तेव्हा त्याला स्किन कॅन्सर म्हणतात. सामान्यतः जुने पेशी नष्ट होतात आणि त्याजागी नवीन पेशी निर्माण होतात, पण कधी कधी या प्रक्रियेत अडथळा येतो आणि पेशी गरजेपेक्षा जास्त किंवा चुकीच्या प्रकारे वाढू लागतात.
यातील काही पेशी नॉन-कॅन्सरस म्हणजेच बिनधोक असतात, पण काही कॅन्सरस पेशी शरीरात झपाट्याने पसरून इतर अवयवांनाही नुकसान पोहोचवू शकतात. खालील लक्षणांद्वारे तुम्ही स्किन कॅन्सरची शक्यता ओळखू शकता:
त्वचेचा रंग बदलणे
जर त्वचेचा रंग अचानक बदलू लागला असेल, तर हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्वचेवर लालसर, जांभळ्या किंवा तपकिरी रंगाचे डाग दिसू लागणे हे सामान्य नाही. हे कपोसी सारकोमा नावाच्या दुर्मिळ स्किन कॅन्सरमुळे होऊ शकते, म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका.
जुना मस्सा बदलणे
शरीरावर असलेला एखादा जुना मस्सा जर रंग बदलत असेल, त्याचा आकार वाढत असेल, रक्त येत असेल किंवा त्यावर सतत खरूज येत असेल, तर तो मेलानोमा नावाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतो.
जखम भरत नसेल
त्वचेवरील एखादी जखम किंवा अल्सर जर अनेक दिवसांपासून भरत नसेल किंवा भरल्यावर पुन्हा होऊ लागला असेल, तर ती गंभीर बाब असू शकते. ही लक्षणे बेसल सेल कार्सिनोमा किंवा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा कॅन्सरशी संबंधित असू शकतात.
नवीन गाठ किंवा उंचवटा
३० वर्षांनंतर त्वचेवर अचानक एखादी नवीन गाठ, उंचवटा किंवा मस्सा निर्माण होतोय का हे पाहा. विशेषतः जर ती गाठ लालसर, गुलाबी किंवा तपकिरी रंगाची असेल, तर स्किन कॅन्सरची शक्यता नाकारता येत नाही.
सतत खाज येणे किंवा जळजळ होणे
त्वचेवर एका विशिष्ट भागात वारंवार खाज येणे किंवा जळजळ होणे हे देखील एक गंभीर संकेत असू शकतो. अशा प्रकारे दिसणारे लक्षण बेसल सेल कार्सिनोमा (BCC) या सामान्य स्किन कॅन्सरमुळे होऊ शकते.
टीप: वरील कोणतेही लक्षण दिसल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर निदान केल्यास उपचार शक्य होतात.