अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना वेगळाच आजार (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे Chronic Venous Insufficiency नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. वैद्यकीय तपासणीत ट्रम्प यांचा आजार आढळून आला. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की ७९ वर्षीय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पायांना सूज आणि दुखापतीमुळे त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत CVI आजाराचे निदान झाले. ट्रम्पबद्दलची ही बातमी समोर येताच, नक्की हा आजार या आहे याबाबत सर्वांना जाणून घ्यायचे आहे. क्रोनिक व्हेनस इन्सफिशियन्सी म्हणजे काय आणि त्यामुळे लोकांना कोणत्या प्रकारच्या समस्या येतात? याबाबत आपण अधिक माहिती घेऊया
Cleveland Clinic च्या अहवालानुसार, क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी (CVI) ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पायांच्या नसा हृदयाकडे योग्यरित्या रक्त पाठवू शकत नाहीत. सामान्यतः, नसांमध्ये लहान झडपा असतात जे रक्त हृदयाकडे वाहून नेतात. जर या झडपा खराब झाल्या किंवा कमकुवत झाल्या तर रक्त परत खालच्या दिशेने वाहू शकते आणि पायांमध्ये जमा होऊ शकते. यामुळे CVI ची स्थिती निर्माण होते. यामुळे पायांच्या नसांमध्ये दाब वाढतो आणि पायांना सूज येण्याव्यतिरिक्त, अल्सर दिसू लागतात. हा आजार फार धोकादायक नाही, परंतु खूप वेदनादायक असू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांना हा आजार कसा झाला?
आजाराचे गांभीर्य
व्हाईट हाऊसच्या निवेदनानुसार, अध्यक्ष ट्रम्प यांना नियमितपणे हस्तांदोलन करण्याच्या आणि अॅस्पिरिन वापरण्याच्या सवयीमुळे ही समस्या झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हृदयरोग टाळण्यासाठी अॅस्पिरिन घेतात. CVI हा एक प्राणघातक आजार नाही, तर वयानुसार आणि काही सवयींमुळे होणारी दीर्घकालीन शिरासंबंधी समस्या आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो.
CVI ची लक्षणे आणि कारणे
या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये पाय किंवा घोट्यांमध्ये सूज येणे, जडपणा किंवा थकवा जाणवणे, त्वचेला खाज सुटणे किंवा मुंग्या येणे आणि Varicose Veins यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये, त्वचेचा रंग बदलू शकतो, जाड किंवा चामड्यासारखा होऊ शकतो आणि पायांमध्ये अल्सर किंवा जखमा देखील होऊ शकतात. जर त्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ही स्थिती खूप वेदनादायक आणि गंभीर होऊ शकते.
CVI च्या कारणांबद्दल सांगायचे झाले तर, जुन्या रक्ताच्या गुठळ्या किंवा दुखापतीमुळे नसांमधील झडपा खराब होतात तेव्हा ही समस्या उद्भवते. वयानुसार, शिरा कमकुवत होतात आणि ही समस्या उद्भवू लागते. बराच वेळ उभे राहणे किंवा बसणे, लठ्ठपणा, गर्भधारणा, अनुवांशिक कारणे, धूम्रपान, कमी शारीरिक हालचाली आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या घटकांमुळेदेखील हा आजार होऊ शकतो.
CVI चा उपाय काय आहे?
कोणता उपाय ठरेल उपयोगी
उपचारांनी CVI ची समस्या पूर्णपणे बरी होऊ शकत नाही, परंतु ही समस्या नियंत्रित करणे शक्य आहे. नियमित चालणे, पाय वर ठेवणे आणि वजन राखणे यासारख्या जीवनशैलीतील बदलांमुळे हा आजार नियंत्रित होऊ शकतो. कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज घालल्याने नसांवर दबाव येतो, ज्यामुळे रक्त प्रवाह सामान्य होतो.
अँटीबायोटिक्स, रक्त पातळ करणारी औषधे यामुळे नियंत्रित केले जाते. स्क्लेरोथेरपी म्हणजे इंजेक्शनद्वारे शिरा बंद करणे, एंडोव्हेनस अॅब्लेशन आणि काही प्रकरणांमध्ये नसांच्या शस्त्रक्रियादेखील केल्या जातात. या आजाराचा उपचार रुग्णाच्या स्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.