कलर वॉक म्हणजे काय आणि काय आहेत फायदे (फोटो सौजन्य - iStock)
थोड्याच दिवसात आपल्या सर्वांचा आवडता सण होळी येणार आहे. होळी हा खरं तर रंगांचा सण.. रंग केवळ आपल्या भावनांवरच परिणाम करत नाहीत तर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील सुधारू शकतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कलर वॉक ही एक अनोखी पद्धत आहे. यामध्ये, एखादी व्यक्ती एक रंग निवडते आणि त्याच्या सभोवतालच्या वातावरणात राहणे पसंत करते. त्याच रंगाच्या वातावरणाच्या शोधात आपल्याला चालावे लागते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणजे नक्की काय?
फोर्टिस हॉस्पिटलमधील मानसिक आरोग्य डॉ. आस्तिक जोशी यांच्या मते, कलर वॉकमुळे केवळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढतेच असे नाही तर आपला मानसिक ताणही कमी होतो. कलर वॉकची कल्पना कलाकार आणि सर्जनशील लोकांकडून करण्यात आली. पण आता ते शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एक लोकप्रिय तंत्र बनले आहे.
कलर वॉक म्हणजे काय?
कलर वॉक कसा करायचा? जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट रंगावर लक्ष केंद्रित करून चालता तेव्हा तुमचे मन सक्रिय राहते आणि तुम्हाला निसर्गाशी अधिक जोडलेले वाटते. यामुळे आपले लक्ष केंद्रित करणे आणि सजगता वाढतेच शिवाय आपले शरीर सक्रिय राहते. नियमितपणे कलर वॉक केल्याने ताण कमी होण्यास आणि मानसिक स्पष्टता येण्यास मदत होते. हे वॉक कसे करायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया.
30 मिनिटे चालणे ठेवते अनेक आजारांना दूर, जाणून घ्या रोज चालण्याचे फायदे
तणावापासून सुटका
कलर वॉकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो ताण कमी करण्यात प्रभावी आहे. जेव्हा आपण एक रंग निवडतो आणि आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करतो तेव्हा आपले मन फक्त वर्तमान क्षणातच राहते. ज्यामुळे चिंता आणि तणावाची समस्या कमी होते. आपण भूतकाळाचा विचार करत नाही आणि भविष्याचाही विचार करत नाही. ही जागरूकतेची एक उत्तम पद्धत आहे; यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते.
एकाग्रता वाढविण्यास उत्तम
जर तुम्ही लेखन, चित्रकला किंवा डिझायनिंग सारख्या कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तर तुम्ही कलर वॉक करून तुमची सर्जनशीलता वाढवू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट रंगावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या मनात नवीन नमुने आणि डिझाईन्स येऊ लागतात. यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. रंगांसोबतचा तुमचा अनुभव तुम्ही डायरीत लिहून किंवा चित्र काढून जपू शकता. जर तुम्हाला कोणत्याही कामात कंटाळा येत असेल तर तुम्ही लगेच कलर वॉकसाठी जाऊ शकता.
शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी
चालण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे आणि जेव्हा तुम्ही तो कलर वॉकसोबत जोडता तेव्हा तो आणखी प्रभावी होतो. या चालण्यामुळे आपले शरीर केवळ सक्रिय राहत नाही तर रक्ताभिसरण, तग धरण्याची क्षमता आणि हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. चालताना तुमचा वेग वेगवान ठेवा, त्यामुळे तुमचे हृदय गती वाढेल. आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस कलर वॉक नक्की करा असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
संवाद चांगला राखण्यासाठी
तुम्ही इतर मित्रांसोबतदेखील कलर वॉक करू शकता. यामुळे तुमचे चालणे अधिक मजेदार बनू शकते. ही एक परस्परसंवादी क्रिया आहे जी सामाजिक संबंध मजबूत करते. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एक रंग निवडू शकता आणि तो एक रंग एकत्र शोधल्यानंतर, आता तुम्ही तुमचा अनुभव एकमेकांसोबत शेअर करू शकता. एकत्र मित्रांसह चालल्याने तुम्हाला आनंद तर मिळेलच पण त्याचबरोबर निरोगी स्पर्धाही टिकून राहील.
निसर्गाशी बांधले राहण्यासाठी
कलर वॉक केल्याने, आपण आपल्या सभोवतालचे वातावरण अधिक खोलवर समजून घेऊ लागतो. जेव्हा आपण निसर्गाशी जोडले जातो तेव्हा आपण त्याच्याशी संबंधित असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचे सौंदर्य देखील पाहू शकतो. आपण स्वतःची जाणीव करून घेऊ लागतो आणि आपल्या जीवनातील लहान आनंदांची कदर करू लागतो. बागेत, उद्यानात किंवा कोणत्याही हिरव्यागार ठिकाणी जा आणि एक रंग निवडून चालत जा. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रंगांवर लक्ष केंद्रित केल्याने तुमचा मूड सुधारेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.