हिवाळ्यामध्ये ओठांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी
हिवाळ्याच्या दिवसात वातावरणात झालेल्या कोरडेपणामुळे तुमच्या ओठांमधील ओलावा कमी होतो ओठांशी संबंधित अनेक समस्या आढळून येतात. हिवाळ्यात तुमचे ओठ अधिक संवेदनशील होतात.हिवाळ्यातील कोरडा हवा देखील ओठ फाटण्यास कारणीभूत ठरते. हिवाळ्यात ओठ फाटणं, त्यातून रक्त येणं, ओठांना चिरा पडणं आणि ते कोरडे पडणं हे सामान्य आहे. ओठांची त्वचा नाजूक तसेच पातळ असते. ओठांची त्वचा संपूर्ण शरीराच्या त्वचेपेक्षा वेगाने कोरडी पडून चिरा पडू लागते.
हिवाळ्यात ओठ खूप कोरडे पडतात, अशा परिस्थितीत जर आपण ओठांना वारंवार स्पर्श केला तर हे देखील ओठ फाटण्याचे कारण असू शकते. जेव्हा तुमचे ओठ कोरडे होऊ लागतात, तेव्हा आपण त्यांना चाटून किंवा जीभ हलवून ओलसर ठेवण्याचा प्रयत्न करतो हे अगदी सामान्य आहे. पण ओठ चाटल्याने त्यांची त्वचा खराब होते. येथे काही टिप्स दिल्या आहेत ज्या हिवाळ्यात तुमच्या संवेदनशील ओठांची काळजी घेण्यास मदत करू शकतात. डॉ. शरीफा चौसे, त्वचारोग तज्ज्ञ, डॉ. शरीफा स्किन केअर क्लिनिक मुंबई यांच्याकडून आम्ही काही सोप्या टिप्स घेतल्या आहेत. हिवाळ्यात संवेदनशील ओठांची काळजी कशी घ्याल? जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
योग्य लिप बाम निवडा
ओठांना लिप बाम लावावा
ओठांची आर्द्रता आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमितपणे लिप बाम वापरा. लिप बाम निवडताना त्यामध्ये शिया बटर, व्हिटॅमिन ई आणि सिरॅमाइड्स सारख्या घटकांचा समावेश असेल याची खात्री करा. कृत्रिम सुगंध, रसायने किंवा अल्कोहोल यासारखे त्वचेस कठोर ठरणारे घटक असलेले लिप बाम टाळा. हे घटक तुमच्या संवेदनशील ओठांना त्रासदायक ठरु शकतात.
हायड्रेटेड राहा
भरपूर पाणी प्या जे तुमच्या ओठांना हायड्रेट राखण्यात मदत करता. हिवाळ्यात निर्जलीकरण सामान्य आहे कारण बऱ्याच लोकांना नेहमीपेक्षा कमी तहान लागते. त्यामुळे हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी आणि तुमचे ओठ कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी दिवसभर पाणी पित राहा.
वारंवार ओठांना जिभेने स्पर्श करु नका
तुमच्या ओठांना वारंवार जिभ लावल्याने ओठ आणखी कोरडे होऊ शकतात. आपल्या लाळेच लगेच बाष्पीभवन होते ज्यामुळे तुमचे ओठ नेहमीपेक्षा जास्त कोरडे पडून ओठांना भेगा पडू शकतात. सतत ओठांना जिभेने स्पर्श केल्याने ओठ अधिक खराब होतात आणि याशिवाय ओठांना भेगा पडल्या असतील तर दाताने चावण्याचा प्रयत्न करू नका.
रात्रभर लिप मास्क लावा
रात्री झोपताना तुम्ही लिप मास्क लाऊन झोपावे
झोपण्यापूर्वी ओठांवर रात्रभरासाठी लिप मास्क किंवा पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावण्याचा एक नवीन ट्रेंड आला आहे. हे तुमच्या ओठांचा आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. यामुळे थंडीत तुमचे ओठ फुटत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. याचा नियमित तुम्ही वापर करावा.
रासायनिक उत्पादनांचा वापर टाळा
काही घटक सहजपणे तुमच्या ओठांना अधिक संवेदनशील बनवू शकतात. सुगंधीत उत्पादनांपासून दूर रहा. लिप ग्लॉस, लिप बाम किंवा लिपस्टिक सारखे कोणतेही लिप उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यात समाविष्ट घटकांची यादी पहा. तुमच्या नाजूक आणि मऊ मुलायम ओठांना त्रासदायक ठरणारे कोणतेही केमिकल त्यात असेल तर तुम्ही ते वापरण्यापासून दूर राहावे.