
बाळ होण्यात काय समस्या येत आहेत (फोटो सौजन्य - iStock)
वंध्यत्व ही आता केवळ ३० ते ४० वर्षांच्या लोकांची समस्या राहिलेली नाही. सध्या, विशीतील मोठ्या संख्येने पुरुष आणि स्त्रिया प्रजननक्षमतेच्या आव्हानांना सामोरे जात आहेत. त्यामुळे, कोणताही विलंब न करता वंधत्व निवारण तज्ज्ञांची भेट घ्या आणि गर्भधारणेसाठी मदत करणाऱ्या एआरटी (ART) तंत्रज्ञानाबद्दल समजून घ्या. डॉ. बुशरा खान, वंधत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
गर्भधारणेसाठी करावा लागतोय संघर्ष
काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रजननक्षमतेच्या समस्या बहुतेकदा वाढत्या वयाशी संबंधित होत्या. मात्र आता डॉक्टर २३ ते २९ वयोगटातील अनेक स्त्रियांना गर्भधारणेसाठी संघर्ष करताना पाहत आहे आणि ही अतिशय चिंताजनक बाब ठरत आहे. आधुनिक जीवनशैली, आरोग्यविषयक समस्या, ताणतणाव आणि पर्यावरणीय घटक अपेक्षेपेक्षा खूप लवकर प्रजनन आरोग्यावर परिणाम करत आहेत. वेळीच जागरूकता, उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ARTs) सारख्या प्रगतीमुळे कमी वयातही आशेचा किरण दिसत आहे.
पुरुषांनो सावधान! वाढत चालली वंधत्वाची समस्या, Fertility वर गंभीर परिणाम; काय आहे कारण
विशीत आढळणाऱ्या प्रजननक्षमतेच्या समस्या
स्त्रियांमध्ये, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), अनियमित मासिक पाळी, ओव्हुलेशनच्या समस्या, थायरॉईड विकार, एंडोमेट्रिओसिस, ओटीपोटाचे संक्रमण आणि अंड्यांची खराब गुणवत्ता यांसारख्या सामान्य समस्या दिसून येतात. पुरुषांमध्ये, शुक्राणूंची संख्या कमी होणे , शुक्राणूंचे वहन योग्यरित्या न होणे , हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान आणि जास्त वेळ बसल्यामुळे किंवा लॅपटॉपच्या वापरामुळे होणारा उष्णतेशी संपर्क यांसारख्या समस्या मानसिक शांतता हिरावून घेऊ शकतात. या समस्यांसाठी वंध्यत्व निवारण तज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे.
काय आहेत त्यामागची कारणं?
आहाराच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, वाढता ताणतणाव, अनियमित झोप, वाढता स्क्रीन टाईम, धूम्रपान, मद्यपान, प्रदूषण आणि हार्मोनल समस्यांचे उशिराने होणारे निदान ही यामागची मुख्य कारणं आहेत. तरुण प्रौढांमध्ये वाढती लठ्ठपणाची प्रकरणं आणि इन्सुलिन प्रतिरोधकता हेदेखील प्रजननक्षमतेसंबंधित समस्यांना कारणीभूत ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये वेळीच उपचार न केल्यास संक्रमण किंवा अनुवांशिक घटक देखील एखाद्याच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात.
लक्षणं कोणती?
अनियमित किंवा वेदनादायक मासिक पाळी, मुरुम आणि चेहऱ्यावर अवांछित केस, वजनात अचानक घटणे किंवा वाढणे, थकवा, लैंगिक इच्छा कमी होणे, लैंगिक समस्या किंवा एक वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे ही धोक्याची लक्षणं आहेत. बरेच लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना वाटते की प्रजननक्षमतेच्या समस्या केवळ ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांपुरत्या मर्यादित आहेत. हा एक गैरसमज आहे आणि तज्ञांकडून यावर लक्ष देण्याची गरज आहे. हल्ली २० ते२७ वयोगटातील लोकांमध्येही प्रजननक्षमतेच्या समस्या आढळून येत आहेत. त्यामुळे, प्रजनन आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
उपचारास विलंब झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम
विशीत प्रजनन समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास हार्मोनल असंतुलनची समस्या उद्भवू शकते , स्त्रीबीज किंवा शुक्राणूंची गुणवत्ता खराब होऊ शकते, भावनिकदृष्ट्या ताण येऊ शकतो आणि उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात. त्यामुळे, प्रजनन आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
विशीतील लोकांसाठी सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाची (ARTs) भूमिका
ओव्हुलेशन इंडक्शन, इंट्रा-युटेरिन इन्सेमिनेशन (IUI), इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि प्रजनन क्षमता जतन करणे यांसारखे सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ARTs) तरुण रुग्णांसाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतात. याचे कारण असे की, विशीत स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असते आणि उपचारांचे यश दर देखील जास्त असतात.
एआरटी हे पीसीओएस, फॅलोपियन ट्यूब्स बंद होणे, पुरुषांमधील गंभीर वंध्यत्व किंवा अज्ञात कारणांमुळे होणारे वंध्यत्व यांसारख्या समस्या असलेल्या महिलांना उपचारात मदत करतात. एग्ज फ्रिजींग हा आणखी एक प्रभावी पर्याय आहे, जो महिलांना भविष्यातील वापरासाठी त्यांच्या अंडपेशी सुरक्षित ठेवण्याची संधी देतो, कारण वयानुसार, विशेषतः पस्तीशीनंतर स्त्रीबीजांची गुणवत्ता आणि संख्या कमी होते. याचा उपयोग कर्करोगावरील उपचार किंवा एंडोमेट्रिओसिससारख्या वैद्यकीय कारणांसाठी, तसेच करिअरमुळे गर्भधारणा लांबविणे किंवा उशिराने होणारे लग्न यांसारख्या सामाजिक कारणांसाठी केला जाऊ शकतो.प्रजनन आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आणि काही समस्या आढळल्यास वेळेवर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. प्रत्येक जोडप्याने वेळोवेळी वंधत्व निवारण तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.