पुरुषांमध्ये का वाढतेय वंध्यत्व (फोटो सौजन्य - iStock)
पुरुषांना निरोगी शुक्राणू तयार करण्यासाठी टेस्टोस्टेरॉन, ल्युटेनाइझिंग हार्मोन (LH), फॉलिकल-स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH) आणि थायरॉईड हार्मोन्ससारख्या हार्मोन्सचे संतुलन राखणे गरजेचे आहे. जेव्हा हे हार्मोन्स असंतुलित होतात, तेव्हा शरीराची शुक्राणू तयार करण्याची क्षमता झपाट्याने कमी होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक पुरुष सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात कारण ही लक्षणं खुप सौम्य असतात किंवा त्यांचा संबंध तणाव, वाढते वय किंवा जीवनशैलीच्या समस्यांशी जोडले जातात. परिणामी प्रजनन समस्यांचे निदान विलंबाने होते, ज्यामुळे उपचार अधिक कठीण आणि दीर्घकाळासाठी चालतात.
नक्की काय घडते?
हार्मोनल विकारांमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन आणि लैंगिक इच्छा कमी होते. थायरॉईडच्या असंतुलनामुळे (हायपरथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझम) चयापचय आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेत बिघाड होतो. प्रोलॅक्टिनची उच्च पातळी टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनात अडथळा आणते आणि यामुळे लिंग ताठरतेच्या समस्या उद्भवू शकतात. इन्सुलिन प्रतिरोध आणि लठ्ठपणामुळे हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या आणि गती कमी होते.
काय आहेत कारणं?
तणावामुळे वाढलेल्या कोर्टिसोलच्या पातळीमुळे पुरुषांच्या प्रजनन हार्मोन्सवरही परिणाम होतो. गेल्या काही वर्षांत तरुण वयोगटातील पुरुष प्रजननक्षमतेच्या समस्या वाढल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या स्थितीचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे या स्थितींमध्ये सुरुवातीला तीव्र लक्षणे आढळून येत नाहीत.
वंधत्वाची लक्षणे कोणती
एखाद्या पुरुषाला केवळ थोडा थकवा जाणवू शकतो, वजन वाढू शकते, लैंगिक इच्छा कमी होऊ शकते किंवा मनःस्थितीत बदल होऊ शकतो. ही लक्षणं सौम्य असल्यामुळे, त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या विलंबामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, हार्मोन्सची पातळी कमी होते आणि काहीवेळा प्रजनन कार्यात अडथळा येतो. वेळीच निदान, जीवनशैलीत सुधारणा, योग्य औषधोपचार आणि हार्मोन थेरपी या समस्या प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी फायदेशीर ठरतील.
काय आहेत उपाय
जर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल आणि त्यात तुम्ही अपयशी ठरत असाल तर पुरुषांनी हार्मोन पॅनेल आणि सीमेन ॲनालिसिस करून घेणे गरजेचे आहे, असा सल्ला विरारच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीचे वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पालगामकर यांनी दिला. प्रजनन क्षमता जपण्यासाठी, पुरुषांनी वजन नियंत्रित राखणे, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान, मद्यपान आणि स्टिरॉइड्सचे सेवन टाळणे गरजेचे आहे. दररोज पुरेशी झोप घेणे तसेच तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
थायरॉईड, टेस्टोस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिनची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे आणि थकवा, लैंगिक इच्छा कमी होणे किंवा गर्भधारणेस विलंब होत असल्यास वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. हार्मोनल विकार ही कोणतीही लक्षणं न आढळता वेगाने वाढू शकतात, त्याचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. नियमित तपासणी आणि वेळीच उपचार केल्यास प्रजनन आरोग्याचे संरक्षण करता येऊ शकते आणि निरोगी गर्भधारणेची शक्यता सुधारते असे डॉ. ज्योत्स्ना पालगामकर यांनी स्पष्ट केले.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
हल्ली अनेक जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. अनेक प्रकरणे पुरुषांमधील हार्मोनल विकारांशी संबंधित आहेत. हे असंतुलन शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम करते, बहुतेक पुरुषांना सुरुवातीच्या लक्षणांची जाणीव होत नाही. त्यामुळे, वेळीच तपासणी, हार्मोनल संतुलन, वजन नियंत्रणात ठेवणे आणि प्रजनन उपचारांद्वारे प्रजनन क्षमता सुधारता येते. गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांनी वेळोवेळी तपासणी करुन वेळीच उपचार घेतल्यास भविष्यातील वंध्यत्वाच्या समस्या टाळता येतात असे मदरहुड फर्टिलिटी अँड आयव्हीएफच्या वरिष्ठ वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. रीटा मोदी यांनी स्पष्ट केले.






