आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार! 'या' आजारांपासून बालकांचा होतो बचाव (फोटो सौजन्य-X)
World breastfeeding day News in Marathi: दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश मातांना स्तनपानाच्या महत्वाविषयी जागृत करणे हा आहे. याचपार्श्वभूमीवर स्तनपान ही बाळाच्या आरोग्याची आणि विकासाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची आधारशीला असते. केवळ पोषण पुरवण्याच्या बरोबरीने इतरही अनेक बाबतीत स्तनपानाचे खूप मोठे योगदान असते. जसजसे वय वाढत जाते, बाळाचा मेंदू आणि मज्जासंस्था यांना स्तनपानातून वेगवेगळे लाभ मिळत राहतात, म्हणूनच नवजात बाळांसाठी हे सर्वात परिपूर्ण पोषण आहे, अशी माहिती नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी,कन्सल्टन्ट डॉ रेणुका बोरिसा यांनी दिली.
तसेच बाळ जन्माला आल्या क्षणापासून परिवर्तनाचा प्रवास सुरु होतो, जो पुढे आयुष्यभर सुरु राहतो. वयाच्या पहिल्या वर्षभरात बाळाचा मेंदू दुपटीने वाढतो, नवनवीन न्यूरल कनेक्शन्स जोडली जातात. दर सेकंदाला १ मिलियन कनेक्शन्स इतका याचा वेग प्रचंड असतो. अशावेळी जास्तीत जास्त पोषण मिळणे अत्यावश्यक असते आणि याची गुरुकिल्ली आहे स्तनपान.
आईच्या दुधातून शॉर्ट आणि मिडीयम चेन ट्रायग्लिसराइड्सच मिळतात, इतकेच नव्हे तर त्यात पॉलीअनसॅच्युरेटेड लाँग चेन फॅटी अॅसिड्स, कोलीन आणि टॉरिन देखील असतात; हे सर्व बाळाला बळकट करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेंदूच्या पुनर्प्राप्तीमध्ये (रिकपरेशन) मदत करतात. मेंदू आणि रेटिनाच्या प्रमुख बिल्डिंग ब्लॉकपैकी एक म्हणजे डोकोसाहेक्साएनोइक अॅसिड (DHA) होय. शिकणे, लक्षात ठेवणे, विचार करणे, समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे यासारखी मानसिक कार्ये, स्मरणशक्ती आणि दृष्टी मजबूत करण्यावर त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. स्तनपान करणारी बाळे लहानपणापासूनच हुशार, मजबूत आणि विकसित होतात आणि हे फायदे त्यांच्या वयानुसार अधिकाधिक वाढत जातात. आईचे दूध हे मेंदू, पाठीचा कणा आणि नसांचे जाळे विकसित होण्यास मदत करणारे सर्वात चांगले संरक्षण आहे कारण ते काळजीपूर्वक संतुलित तर असतेच, शिवाय त्यामध्ये लिपिड, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स देखील असतात.
आईच्या दुधाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे ते ‘जिवंत’ अन्न आहे. आईचे दूध बाळाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेते. बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी ते एंजाइमसह विशिष्ट अँटीबॉडीज प्रदान करते. यामुळे बाळाला मेनिंजायटीस किंवा श्वसन संसर्गासारखे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असे आजार न्यूरोलॉजिकल अर्थात मेंदूच्या विकासात अडथळा आणू शकतात. याव्यतिरिक्त, स्तनपानाची शारीरिक क्रिया, आईच्या त्वचेशी जवळचा संपर्क, आईची उबदार कूस आणि प्रेमळ नजर हे सर्व घटक मेंदूच्या चांगल्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्तनपानाचा आणखी एक फायदा म्हणजे विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या विकारांचा धोका कमी होतो. पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे की स्तनपान करणाऱ्या बाळांना ऑटिझम स्पेक्ट्रम विकार, एडीएचडी आणि इतर वर्तणुकीशी संबंधित आव्हाने उद्भवण्याची शक्यता कमी असते. याव्यतिरिक्त, अकाली जन्मलेल्या बाळांसाठी, ज्यांना न्यूरोडेव्हलपमेंटल कमतरतांचा धोका जास्त असतो, त्यांच्यासाठी मज्जासंस्थेवर आईचे दूध संरक्षण कवच ठरते.
स्तनपान भावनिक आराम देण्यात आणि सुरक्षितता वाढविण्यात देखील मदत करते. बाळाच्या पोषणाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे. स्तनपानाचा प्रेमळ अनुभव ऑक्सिटोसिन स्त्रवण्यात मदत करतो, हे हार्मोन आई आणि बाळ दोघांच्या मानसिक आरोग्याला आधार देत त्यांच्यातील जवळीक मजबूत करते. थोडक्यात, आईचे दूध बाळासाठी अमृत आहे, निसर्गाची ही अद्भुत निर्मिती गतिमान, संरक्षणात्मक आणि बुद्धिमान अन्न म्हणून बाळाच्या शरीराचे पोषण करते.