फोटो सौैजन्य - Social Media
नवी मुंबईतील पनवेल येथे नुकत्याच घडलेल्या डान्सबार तोडफोड प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसेच्या पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकाऱ्यांनी ‘नाईट रायडर’ या डान्सबारवर रात्री उशिरा हल्ला चढवत जोरदार तोडफोड केली. या घटनेनंतर पनवेल पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत.
घटनाक्रम असा घडला की, शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर नेते एकत्र मंचावर उपस्थित होते. मराठी जनतेच्या हक्कांच्या संदर्भात राज ठाकरे यांचे भाषण सुरू असतानाच, त्यांनी पनवेलमध्ये वाढत्या डान्सबार संस्कृतीवर टीका केली. त्यांच्या या भाषणानंतरच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि लगेचच नाईट रायडर बारवर धडक देत, तिथे मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पनवेल पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, योगेश चिले यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक शांतता भंग करणे. या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सध्या सर्व आरोपी फरार असून, पनवेल शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत नाही, तर राजकीय दृष्टिकोनातूनही संवेदनशील मानली जात आहे. आगामी काळात यासंदर्भात राजकीय पक्षांची प्रतिक्रिया आणि पोलिसांची कार्यवाही काय होते, याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.