
MNS on Nashik Tree Cutting:
या पार्श्वभूमीवर आज, शनिवारी (6 डिसेंबर) महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवनात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष अमेय खोपकर, अभिनेते संतोष जुवेकर यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले. आंदोलनादरम्यान अमेय खोपकर यांनी पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी वृक्षतोड आणि साधूग्राम प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पर्यावरणाचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी केली.
अमेय खोपकर म्हणाले की, सरकारने झाडांवर फुल्या मारल्या आहेत, हे पाहून मलाच लाज वाटत आहे. हे आई-वडिलांवर फुल्या मारल्यासारखे आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकाही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जसं पार्थ पवारांना माफ केलं, तसं या झाडांनाही माफ करा. सरकारकडून झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर मनसे मोठे आंदोलन छेडेन, त्यामुळे एकाही झाडाच्या फांदीला हात लागता कामा नये.
अमेय खोपकर म्हणाले की, मनसे एकही झाड तोडू देणार नाही, मंत्री गिरीश महाजन खोट बोलत असून ते कुठेही गेले नाहीत. आम्ही नाशिकमध्य साधू महंतांचे स्वागत करतो. पण उरावर बसून आम्ही कुंभमेळा होऊ देणार नाही. सरकारचा या परिसरात रेसिडेन्शिअल झोन करण्याचा प्लॅन आहे. त्यासाठी ही जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव आबे. आम्हाला यात काही राजकीय पोळी भाजाची गरज नाही. पण जिथे १५ हजार झाडे लावणार आहात, त्याच ठिकाणी सरकारने कुंभमेळा भरवावा, असा टोलाही खोपकर यांनी लगावला.
नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आता सत्ताधारी पक्षातील शिवसेनाही आक्रमक झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच वृक्षतोडीला स्पष्ट विरोध दर्शवला होता. त्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही या विषयावर भूमिका कठोर केल्याचे समोर आले आहे. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात शुक्रवारी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरणास होणाऱ्या संभाव्य नुकसानाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाने निर्णय पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.