38th National Games Maharashtra's Double Blast in Modern Pentathlon Mayank Wins Gold Saurabh Wins Bronze
हल्दवानी : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सलग तिसर्या दिवशीही सुवर्णयशाची धडाकेबाज कामगिरी केली. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयांक चाफेकरने सुवर्णपदकाची बाजी मारली. पाठोपाठ सांघिक गटातही महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. वैयक्तिक प्रकारातील कांस्यपदकही महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने जिंकले.
तिसऱ्या दिवशीही महाराष्ट्राचा जयजयकार
गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग तिसर्या दिवशीही महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. टेट्रार्थलॉन प्रकारात ठाणेच्या मयांक चाफेकरने 1126 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. हरियाणाच्या बसंत तोमरने 1076 गुणांसह रौप्य पदक तर जिंकले तर महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने 1065 गुणांची कमाई करीत कांस्यपदकही जिंकले. 200 मीटर जलतरण, तलवारबाजी, 1600 मीटर धावणे, लेझर नेमबाजी व 600 मीटर धावणे असा हा दमछाक व कौशल्यपूर्ण प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसर्यांदा सुवर्णपदक पटकवले. गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्राने पदकाची लयलूट केली होती.
टेट्रार्थलॉन सांघिक प्रकारातही महाराष्टाचा संघ अव्वल
टेट्रार्थलॉन सांघिक प्रकारातही महाराष्टाचा संघ अव्वल राहिला. मराठामोळे क्रीडापटू मयांक चाफेकर, सौरभ पाटील व पुण्याचा जय लवटे त्रिमूर्तींनी 3179 गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. रौप्यपदक गोवा तर कांस्य पदक हरियाणा संघाला मिळाले. मयांक व सौरभचे हे स्पर्धेतील सलग तिसरे पदक आहे. ट्रायथले शर्यततीत मयांकनेे कांस्य पदक तर कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने बायथले प्रकारात रूपेरी यश संपादन केले होते. पदकविजेत्या संघाला शेखर खासनीस व घनश्याम कुवर, आहिल्या चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राचे उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे व आंतरराष्ट्रीय खेळाडू विरज परदेशी यांनी हस्ते विजेत्यांना पदके बहाल करण्यात आली.