धक्कादायक ! 40 वर्षीय महिलेला कुटुंबियांनीच बांधले साखळदंडाने; गळ्यात साखळी लावून कुलूपही लावलं
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापूरच्या राजारामपुरी येथे ही घटना घडली. एका 40 वर्षीय महिलेला साखळदंडाने बांधून ठेवण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळीने बांधून त्याला कुलूप लावण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापूरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरात असलेल्या दौलतनगर भागातील ही घटना आहे. या ठिकाणी दोन मजली घर आहे. या घरामध्ये गेल्या महिनाभरापासून ४० वर्षीय सारिका साळी या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी साखळदंडाने बांधून ठेवले होते. ही माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी शुक्रवारी अचानक त्या घरावर धाड टाकून महिलेची मुक्तता केली. दरम्यान, ही महिला वेडसर आणि अपंग असल्यामुळे घरातील लोकांनी तिला बांधून ठेवले, असे समजते.
गळ्याला, पायाला बांधले होते कुलूप
पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला जाड साखळीने बांधून ठेवत त्याला मोठे कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांनी या महिलेची सुटका करत तिच्या गळ्यातील आणि पायातील साखळी काढून तिला रुग्णालयात नेले. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, भावाने आणि घरच्यांनी मला बांधून ठेवले होते. त्यांनी मला चांगल्यासाठी बांधून ठेवले होते.
अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, करंदी (ता. शिरुर) येथील एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करुन अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्यालाही अटक केली आहे. मुंजाजी कामाजी कदम (वय.२१ वर्षे रा. पेठ पिंपळगाव जि. परभणी) आणि ज्ञानेश्वर छत्रपती कदम (वय. २३ वर्षे रा. सुन्ना जि. परभणी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.