मुंबई : हिरे व्यापारी आणि ट्रेडर्सकडून ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे वळवली आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांना मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लखनौ येथील राहत्या घरातून अटक केली. विशेष म्हणजे, सावंत हे २०१७ ते २०१९ या काळात ईडीच्या मुंबई विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत होते. सावंत यांनीच तपास केलेल्या प्रकरणात ईडीने त्यांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लखनौमध्ये सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात (जीएसटी) अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सचिन सावंत हे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ईडीच्या पथकाने मंगळवारी त्यांच्या राहत्या घरासह मालमत्तांवर छापेमारी केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. याचदरम्यान ईडीने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. सावंत यांना पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात आले असून विशेष पिएमएलए न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. हिरे व्यापाऱ्यांनी कंपन्यांद्वारे ५०० कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्याप्रकरणी सावंत यांच्या नेतृत्वाखालील तपास करण्यात आला होता. तपासादरम्यान बेकायदेशीर कारवाया समोर आल्या. तसेच, याप्रकरणातील एका आरोपीने सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आरोपीच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सावंत यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ईडीने केलेल्या तपासात अज्ञात स्त्रोतांकडून सचिन सावंत यांच्या कुटुंबीयांच्या खात्यात आणि त्यांचे सासरे व मेहुणे संचालक असलेल्या डमी कंपनीच्या खात्यात सव्वा कोटी रुपये जमा झाले. याच कंपनीच्या माध्यमातून काही स्थावर मालमत्तांचीही खरेदी झाली, ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी काही वैयक्तिक प्रकारचे कर्ज व बँकांकडून कर्ज घेतल्याचे दाखविले गेले. डमी कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या फ्लॅटचा सावंत वापर करत असल्याचे तपासात समोर आले.
आर्थिक बाबींचा आणि व्यवहारांचा तपास सुरू
ईडीने तपासाअंती सावंत यांच्या राहत्या घरासह अन्य मालमत्तांवर छापेमारी करून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, दस्तऐवज ताब्यात घेतले आहे. ईडीने सावंत यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते समाधानकारक उत्तरे आणि पुरावे देऊ शकले नाही. अखेर ईडीने त्यांना मनी लाँड्रिग कायद्यान्वये अटक केली आहे. गुन्ह्यातील सर्व आर्थिक बाबीचा आणि व्यवहारांचा तपास सुरु असल्याचे ईडीने सांगितले.