कणकवली शहरातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्समधील एका मोबाईल शॉपीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा सुरु केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही. अखेर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, त्यानंतर आग नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र शॉपमधील मोबाईल व साहित्य जळून ८ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आ.नितेश राणेंनी घटनास्थळी भेट दिली.
कणकवली येथील बाजारपेठ मेन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावरील गणेश घोळे यांचे मालकीच्या गाळ्यामध्ये भाडेकरु सुरेश कुमार चौधरी व संग्राम राम चौधरी या दोघांनी जय श्री मोबाईल हे मोबाईल स्पेअर पार्टचे दुकान घातले होते. दुकानामध्ये अचानकपणे शॉर्टसर्कीटने आग लागून संपूर्ण दुकानातील वस्तू जळून नुकसान झाले आहे. त्यामध्ये मोबाईल डिस्प्ले एलसीडी ३०० नग ३,९०,०० हजार रुपये, मोबाईल कव्हर १००० नग ३०,००० हजार रुपये, मोबाईल बॅटरी १०० नग ५०,००० हजार रुपये, मोबाईल पॉवर बॅंक १०० नग ६०,००० हजार रुपये, मोबाईल चार्जर १०० नग १० हजार रुपये, मोबाईल स्क्रिन गार्ड ५०० नग १५ हजार रुपये, स्पीकर ३० नग १५ हजार रुपये, ब्लूटुथ ५० नग १० हजार रुपये, स्मार्ट वॉच ५० नग २५ हजार रुपये, नेक बॅंड ब्लूटुथ ५० नग २० हजार रुपये, मोबाईल बॅक पॅनल १०० नग १० हजार रुपये, मोबाईल सीसीबोर्ड २०० नग २५ हजार रुपये २५ हजार रुपये, सी.सी.टीव्ही ३० हजार रुपये, लाईट फिटींग ट्युबलाईट फॅन २० हजार रुपये, दुकानातील फर्निचर १ लाख रुपये एकूण सर्व ८ लाख १० हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा कणकवली तलाठी सुवर्णा कडूलकर व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला.
या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालडकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी अण्णा कोदे, संतोष पुजारे, चेतन अंधारी दत्ता शंकरदास, संजय राणे, राजू पारकर, शेखर गणपत्ये, आबा माणगावकर,गणेश काटकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले होते.