
99th akhil marathi sahitya samelan held in January under the chairmanship of Vishwas Patil
प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ ते ४ जानेवारी २०२६ होणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने, पुस्तकचर्चा, कथाकथन व सांस्कृतिक कार्यक्रम अशी विविधरंगी साहित्यिक मेजवानी असणार आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी, तसेच चार दिवसांचे भव्य ग्रंथप्रदर्शन वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वाढलेल्या सहभागामुळे यंदाचे संमेलन अधिक उत्साहवर्धक ठरणार आहे.
विविध विषयांवर होणार परिसंवाद
परिसंवाद आणि चर्चासत्रांची समृद्ध पर्वणी हे या संमेलनाचे मुख्य आकर्षण आहे. मराठी प्रकाशन व्यवहार, कोशवाङ्मय, अभिजात दर्जानंतरची मराठी, भय-रहस्य साहित्याचा दुष्काळ, स्त्री चळवळीची ५० वर्षे, बदलते ग्रामीण वास्तव अशा विविध विषयांवर मान्यवर लेखक सहभागी होणार आहेत.
हे देखील वाचा : महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा
समकालीन पुस्तकांवर प्रथमच चर्चा
अमोल पालेकर लिखित ‘ऐवज’ आणि शाहू पाटोळे यांचे ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकांवर स्वतंत्र सत्रे होणार असून समकालीन पुस्तकांवर प्रथमच विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अनुराधा पाटील आणि प्रसिद्ध लेखक-संपादक गिरीश कुबेर यांच्या मुलाखती देखील मोठे आकर्षण ठरणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम
यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संतसाहित्याला अभिवादन करणारा डॉ. भावार्थ देखणे आणि सहकाऱ्यांचा ‘बहुरुपी भारूड’ हा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग, महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीस उतरलेले ‘फोक आख्यान’ सादर होणार आहे.
संमेलनाची वैशिष्ट्ये
– पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग
– सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण
– साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी बालकुमार वाचककट्ट्यावर विद्यार्थ्यांचा संवाद
– कवी आणि गझलकारांसाठी कविकट्टा आणि गझलकट्ट्याचे आयोजन
– चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद
– ९९ विद्यार्थी उद्घाटन सोहळ्यात एका सुरात गाणार ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींचे गीत.
– ‘अटकेपार’ या स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिल्ह्यातील वैविध्य
हे देखील वाचा : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून; शेतकरी कर्जमाफीसह ‘हा’ मुद्दा ठरणार चर्चेचा
अतिरिक्त एक कोटी अजूनही बाकी !
साहित्य संमेलन बोधचिन्ह अनावरण सोहळ्यात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सीएसआर निधी सोबतच अतिरिक्त एक कोटी देण्याची घोषणा केली होती परंतू संमेलनाला अवघे काही आठवडे राहिले असून हा निधी अजूनही देण्यात आलेला नाही असे मिलिंद जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.