
सातारा : राज्यसरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी जमली आहे. पण त्याचबरोबर तलाठी आणि ग्रामसेवकांकडून महिलांची आर्थिक लूट होत असल्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. ही गर्दी आणि आर्थिक लूट टाळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा या योजनेत मोठा बदल केला आहे.
मंत्री शंभुराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना या योजनेतील बदलाची माहिती दिली आहे. सरकारने या योजनेला मुदतवाढ दिल्याने महिलांना अर्ज करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. यासाठी आम्ही काही पथके तयार केली आहेत. या पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नारीशक्ती अॅपवर महिलांचे अर्ज भरून घेणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
तसेच, या योजनेसाठी महिलांना कुठल्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. याउलट सरकारचे नेमलेले सदस्यच त्यांच्या दारात जाणार आहेत. यासाठी 5 जणांची पन्नास पथक बनवण्यात येतील आणि या पथकातील सदस्य घरोघरी जाऊन महिलांचे अर्ज भरून घेतील. सातारा जिल्ह्यातील प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून सोमवारी याचा शुभारंभ होईल, असेही शंभुराज देसाईंनी सांगितले.
त्यासोबतच जर कुठला दाखला नसेल तर संबंधित विभागाला माहिती देऊन त्यांना तो दाखला तातडीने देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. 6 ऑगस्टपूर्वी साताऱ्यातील आठ लाक महिलांची नोंदी करण्याच्या सुचनाही दिल्याचे शंभूराज देसाईंनी म्हटले आहे.
याशिवाय, या योजनेशी संबंधित जे कोणी पैशांची मागणी करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता सरकारी कार्यालयांधील गर्दीला आळा बसणार आहे.