
फोटो सौजन्य- प्रतिनिधी
नुकतीच कुर्ला व सीएसएमटी स्थानकाबाहेर घडलेल्या बसच्या घटना ताजी असतानाच अहिल्यानगर शहर बस सेवेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून शहर बस सेवा सुरू झाल्यापासून नगरकरांच्या नशिबी जुन्या बस माथी मारण्यात आल्याचे दिसून येत आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबरच प्रवासी संख्या वाढत असताना देखील शहर बस सेवेकडून बसेसची दुरुस्ती तसेच देखभाल केली जात नसल्याचे अनेक नागरिकांनी तक्रार केले आहे. महापालिकेची शहर बससेवा गेल्या काही महिन्यांपासून नावापुरतीच उरली आहे. ठेकेदाराने ३० बस सुरू करणे आवश्यक आहे. परंतु शहरात सध्या केवळ १५ बस धावत आहेत. ही बससेवा अपुरी पडत असून नगरकरांची गैरसोय होत आहे. त्यातही ज्या काही बस रस्त्यावर धावतात. त्याची अवस्था अतियश दयनीय असून त्या बस गाड्या भंगारात विकल्या जातील, अशी त्यांची स्थिती आहे. या बस गाड्या चालविणाऱ्या वाहन व चालक यांची खरी कमाल आहे. प्रवाशांना बसण्यासाठी सिट (बाक) तुडलेल्या अवस्थेत, बसच्या खिडक्यांना काचा नाही, अनेक बसमधील चढतानाचे पायाऱ्यांचे पत्रा निघालेला आहे, तर गाड्यांचे बॅटरी उघड्यावर दिसून आले तरी ठेकेदार या बसेस वापरत असून प्रवाशांच्या जिवाशी खेळ असल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी याविरोधात आवाज उठवला आहे.
धोकादायक अवस्थेत असलेल्या आणि शेवटच्या घटका मोजत असलेली अहिल्यानगर शहर बस सेवा नगर शहरातील विविध मार्गावरून आजही फिरत आहेत. शहर बस सेवेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्ते नितीन भूतारे यांनी महापालिका प्रशासन तसेच परिवहन विभागाला तक्रार केली आहे.याबाबत नितीन भुतारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना शहर बस सेवेच्या अवस्थेची माहिती दिली तसेच नुकतेच कुर्ला येथील घटनेचा दाखला देत नागरिकांच्या जीवाशी प्रशासन खेळत आहे का असा सवाल त्यांनी केलाय.
बसेसमुळे महापालिकेची लूट
नितीन भुतारे म्हणाले की, कुर्ल्यात आताच एक मोठी दुर्घटना घडली आहे. नगर शहरातील बसेसची परिस्थिती ही फार भयावह आहे. प्रवाशांच्या जागेवर पत्रे बाहेर आले आहेत. प्रवाशांना पत्रा लागून जख्मी होऊ शकतात. बसचे टायर, स्टेअरिंग नीट नाहीत. तसेच या बसचे पीयुसी पण बोगस पद्धतीने काढल्याचे दिसते. या गाड्यांमधून प्रदुषण ही मोठ्या प्रमाणात होते. वाहतूक करण्याच्या पात्रतेच्या या बसेस नाही मात्र महापालिका या बसना पोसण्याचे काम करते. ठेकेदार हे शिवसेना जिल्हाप्रमुखाचे भाऊ आहे. दरमहिन्याला 5 लाख रुपये नुकसान भरपाईसाठी दिले जातात. प्रवाश्यांनी गच्च भरुन या बस चालतानाही नुकसान भरपाई दिली जाते. शिवसेना राष्ट्रवादी आपपाले ठेके वाटून घेतात. अशाप्रकारे महापालिकेला लुटण्याचे काम सुरु आहे. असे आरोप नितीन भुतारे यांनी केले आहे.
महापालिका आयुक्तांची प्रतिक्रिया
अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे हे यासंबंधी म्हणाले की, तातडीने त्या ऑपरेटरला सूचना करत आहोत की त्याने पुढील दहा दिवसात दुरुस्त्या करुन घ्याव्या आणि प्रवाश्यांना चांगल्या सुविधा द्याव्या. ऑपरेटरकडून पालन न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.