
पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही जीव गेला; पवनीतील हृदयद्रावक घटना
पवनी : पत्नी कालव्यात बुडत असल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी पतीने पाण्यात उडी घेतली. मात्र, कालव्याच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग यामुळे पती-पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी पवनी तालुक्यातील कोरंभी येथे घडली. स्वप्नील अशोक बनकर (वय २९) आणि प्रज्ञा स्वप्नील बनकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाय धुताना पत्नीचा पाय घसरला
स्वप्नील आणि प्रज्ञा बनकर हे दाम्पत्य रोजगारानिमित्त नागपूर येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी आले होते. रविवारी दोघेही शेतावर गेले होते. सायंकाळी सुमारे ५ वाजता शेतातून घरी परतत असताना त्यांच्या पायांना चिखल लागला होता. त्यामुळे महादेव देवस्थान मार्गावरील कालव्याच्या पायऱ्यांजवळ ते पाय धुण्यासाठी उतरले.
यावेळी प्रज्ञा यांचा पाय घसरल्याने त्या खोल पाण्यात पडल्या. पत्नी पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच स्वप्नील यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली. मात्र, कालव्यात सुमारे चार मीटर खोल पाणी असल्याने आणि प्रवाह वेगवान असल्याने दोघेही पाण्यात बुडाले.
हे सुद्धा वाचा : दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच आई-वडिलांवर हल्ला; भोसरीतील धक्कादायक घटना
अंधारामुळे शोधकार्यात अडथळे
घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दाम्पत्याचा शोध घेण्यासाठी गोताखोरांची मदत घेण्यात आली. मात्र, पाण्याची खोली, प्रवाहाचा वेग आणि रात्रीचा अंधार यामुळे शोध व बचावकार्यात अडचणी येत असल्याचे पवनीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांनी सांगितले. या घटनेने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पवनी पोलीस पुढील तपास करत आहेत.