
पुणे महापालिका वसाहतीत आग; तीन नगरसेवक वास्तव्यास असूनही दुरवस्था कायम
पुणे : आंबील ओढा कॉलनीतील सानेगुरुजीनगर येथे शनिवार (दि. १५) सकाळी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील मीटर रूमला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, या घटनेने वसाहतीतील असुरक्षित आणि जर्जर स्थिती पुन्हा एकदा उघड केली आहे. गेल्या काही वर्षांत अशा तीन आग लागल्याच्या घटना घडल्यानंतरही मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
स्थानिकांच्या मते, आग आटोक्यात आणण्यासाठी विलंब झाला आणि त्याची माहिती प्रशासनाला बराच वेळ मिळाली नाही. वसाहतीतील इमारतींची ढासळलेली स्थिती, असुरक्षित विद्युतजाळे आणि दुरुस्ती अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिस्थिती अशी की, सत्ताधारी भाजपचे तीन नगरसेवक स्वतः या वसाहतीतत राहत असूनही सुधारणा झालेल्या नाहीत.
निधी कुठे जातो याचे प्रशासनाने उत्तर द्यावे
युवक काँग्रेसचे सागर धाडवे यांनी या घटनेनंतर मनपा प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर थेट आरोप केले. त्यांनी म्हटले की, मनपा वसाहतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात, पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे. निधी कुठे जातो याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे. ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचे संगनमत मनपा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे धाडवे यांनी सांगितले.
प्रशासनाच्या निष्क्रियतेचे गंभीर उदाहरण
धाडवे म्हणाले की, मागील तीन आगींनंतर कोणताही पंचनामा किंवा जबाबदारांवर कारवाई झाली नाही, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे गंभीर उदाहरण आहे. कर्मचारी शहराची सेवा बजावतात, पण त्यांच्या राहत्या घरांची अवस्था प्रशासन जाणीवपूर्वक दुरुस्त करत नाही, युवक काँग्रेसने याप्रकरणी तत्काळ चौकशी करण्याची, आगीचा पंचनामा व दुरुस्तीतील संभाव्य भ्रष्टाचाराची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही सागर धाडवे यांनी दिला आहे.