पुणे : सध्या अनेकांना काहीना काही तरी वेगळं करण्याचा छंद असतो. काहींना जुनी कात्रणं, जुने फोटो तर काहींना इतर विशेष असं संग्रही ठेवण्याची आवड असते. अशाप्रकारे कात्रजमधील पराग सुरेश जगताप यांना देखील जुन्या नाण्यांचा संग्रह करण्याचा एक विशेष छंद आहे. त्यांच्या संग्रही शे-दोनशे नाही तर तब्बल 3 हजार नाण्यांचा संग्रह आहे. यामध्ये सुमारे चारशे नाणी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शिवकालीन नाणी आहेत.
शिवकालीन नाणे संग्रहक आणि अभ्यासक असलेल्या पराग जगताप यांच्याकडे मोठा संग्रह आहे. ब्रिटिश इंडिया ते स्वतंत्र भारतातील 2023 मधील 75 वा आझादी का अमृत महोत्सवापर्यंतची नाणी त्यांच्याकडे जमा आहेत. देश-विदेशातील नाणीही त्यांच्या संग्रही आहेत. यापैकी 12 राशींचे 12 नाणी ती सोमोलिया लँड या देशातील आणि थायलंडमधील 20 हजारांची नोट आहे. त्यावर गणपतीचे छायाचित्र आहे. तसेच भारतातील विविध छायाचित्र असलेली नाणी जमा आहेत.
दुर्गादेवीचं नाणेही संग्रही
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी यांच्यापासून ते आता आलेलं दुर्गादेवीचेही नाणे संग्रहित आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं भारत सरकारने काढलेलं 2 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये मूल्य असलेल्या नाण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व खात्याने 1981 ला सुवर्ण होन कसा होता हे दाखवण्यासाठी सुवर्ण होन प्रतिकृती पत्रिका काढली होती. ती त्यांच्या संग्रही आहे. ही नाणी इतकी दुर्मिळ आहेत की ते आता मिळणे कठीण आहे.
माझ्या संग्रहात अनेक नाणी : पराग जगताप
”माझ्या संग्रहात 16 शतकापासून ते 19 शतकापर्यंतची विविधतेने नटलेली शिवराई पाहायला मिळेल. विशेषत: यावर असलेली अक्षरे, चिन्हे पाहण्यासारखी आहेत. चिन्हही या शिवराईवरची अभ्यासण्यासारखी आहेत. चंद्र, सूर्य, शिवपिंड, भवानी तलवार, त्रिशूल असे एकापेक्षा अनेक चिन्ह या नाण्यावर पाहायला मिळतात. ती मी संग्रहित आणि अभ्यासित आहे. ही नाणी आज हातात घेतल्यावर त्या काळ कसा असेल याचं साक्ष आज आपल्याला देतो”, असे जगताप म्हणाले.