Drowned
लोणावळा : ऐन दिवाळीमध्ये भाऊबीज आणि पाडवा सणाच्या दिवशी आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यातील भुशी धरणावर फिरायला आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रोहन जोगींदर लाहोट (वय १७ रा. ट्राझीट कॅम्प, रमाबाई कॉलनी, घाटकोपर, मुंबई) असे या मृत मुलाचे नाव आहे. शिक्षक अमितकुमार जगदंबशरन पांडे आणि क्लास मधील इतर सहा विद्यार्थी मित्रांसोबत रोहन हा लोणावळा येथे फिरण्यासाठी आला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो भुशी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये उतरला असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडाला. ही घटना समजताच शिवदुर्ग मित्रच्या सदस्यांनी धरणाकडे धाव घेतली.
लोणावळा शहर पोलिसांच्या मदतीने शिवदुर्ग मित्रचे सचिन गायकवाड, योगेश उंबरे, अशोक उंबरे, अमित भोसले, ओंकार पडवळ, सागर कुंभार, अमोल चिनुरे, राजेंद्र कडु, अजय मयेकर, अमोल परचंड, अमोल सुतार, सुनिल गायकवाड यांनी रोहन याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. ऐन सणासुदीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र त्याचवेळी आपला सण बाजूला ठेऊन मदतीसाठी पोचलेल्या शिवदुर्ग मित्राचे कौतुक देखील ऐकायला मिळत आहे.