
पेसातील शिक्षकांची १७ हजार पदे रिक्त
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार असताना ‘पेसा’ अंतर्गत शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. आदिवासीबहुल १३ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची 17 हजार पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्यात यावी, अशी मागणी करत आदिवासी संघटनांनी शिक्षण आयुक्ताकडे धाव घेतली आहे.
शिक्षण आयुक्तांनी २४ जुलै २०२३ रोजी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रातून पेसा क्षेत्रातील १७ हजार ३३ पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. याच पत्राचा आधार घेऊन संघटना पदाधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयात धाव घेऊन पदभरती करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेंतर्गत सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती या प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या १७ हजार ३३ इतकी आहे. सन २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पेसा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या ७ हजार १६६ होती.
हेदेखील वाचा : BMC Elections : “भाजपचा मुंबई ‘महापौर’पदाचा अमराठी उमेदवार मोहित कंबोज..; शिवसेना ठाकरे गटाचा मोठा दावा
यापैकी पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता टीईटी, सीटीईटी अर्हता धारण करणारे ४९०४ इतके उमेदवार होते. यात पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासी उमेदवारांचाही समावेश आहे. तत्कालीन शिक्षण आयुक्तांनी आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी, मानधन तत्त्वावर आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांत १५४४ आदिवासी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. यात टीईटी उत्तीर्ण उमेदवारासह डीएड, बीएड उमेदवारांचा समावेश आहे.
अनेक शिक्षकांना नियुक्त्या नाहीत
अनेक शिक्षक एक वर्षापासून मानधनावर आहेत. यातील शिक्षक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना अद्यापही कायमस्वरूपी नियुक्त्या दिलेल्या नाहीत. काही जिल्ह्यात कंत्राटी, मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या आदिवासी उमेदवारांना कमी करण्यात आल्याचे शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शिक्षकांची भरती कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
नांदेड, चंद्रपूर, पुणे जिल्ह्यांमध्ये रखडली भरती
राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १३ जिल्हे आदिवासीबहुल असून यात ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांतील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) आदिवासी शिक्षक उमेदवारांची भरती रखडली आहे. आता टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण अनुसूचित जमातीचे उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाही, तर पेसा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या डीएड, बीएड उमेदवारांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करावी, त्यांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षांची संधी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.