सातारा : सातारा जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण परजिल्ह्यांतून दाखल झाला असून, त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी काेरोनाने अनेक लोकांचा जीव घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ही कोरोनाची लाट ओसरून जवळपास दोन वर्ष उलटून गेली परंतु आता राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.
चिपळूणमधील एक ५५ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीला कऱ्हाडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्या व्यक्तीला रुग्णालय प्रशासनाने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. गेल्या दोन दिवसांपासून त्या रुग्णावर उपचार झाल्याने त्या रुग्णाच्या प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा झाली आहे. दोन दिवसांत त्या रुग्णाला घरी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी सांगितले.