विदर्भा नदीच्या पुलावरून पुरात ट्रक कोसळला
वणी : वणी येथे वणी-मुकुटबन मार्गावरील नेरडचा (पुरड) पूल पार करताना एक दुर्घटना घडली. यामध्ये एक ट्रक नदीतच कोसळला. यातील धक्कादायक बाब म्हणजे यात ट्रकचालक वाहून गेल्याची माहिती दिली जात आहे. रमाकांत शात्रीकर (वय 45) असे वाहून गेलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. ते मूळचे भद्रावती येथील रहिवासी असून, ते सध्या वणीतील भोईपुरा येथे आपल्या कुटुंबीयांसह राहत असल्याचे सांगितले जात आहे.
हेदेखील वाचा : “महाराजांचा अपमान करणारे सगळे भाजप प्रॉडक्ट, काकांचा पक्ष चोरणाऱ्यांनी…”; संजय राऊतांचे टीकास्त्र
रमाकांत शात्रीकर हे मुकूटबन परिसरात असलेल्या एका कंपनीत ट्रक घेऊन जात होते. पण या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. या ठिकाणी रात्रीदेखील पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे विदर्भा नदीला पूर आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास रमाकांत हे ट्रक घेऊन मुकुटबनच्या दिशेने जात होते. नेमकं याचदरम्यान नेरड (पुरड) जवळील पुलावर अंदाज न आल्याने ट्रक पुलावरून कोसळला. या अपघातात ते नदीत वाहून गेले, अशी माहिती देण्यात आली आहे.
वणी उपविभागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
मोहुर्ली येथील पुलावर पाणी असल्याने ते अडकले होते. पुरात वारगाव येथील एक गाय वाहून गेली. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहे. मारेगाव तालुक्यात पावसाने मोठे नुकसान केले आहे. वणी उपविभागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आला होता.
नांदेडकडे जाणारा मार्ग बंद…
नांदेडकडे जाणारा मार्ग बंद असून, नागपूर-तुळजापूर या राज्यमहामार्गावर पैनगंगा नदीच्या मार्लेगाव पुलावर मोठ्या दोन पुलांची निर्मिती होत असून, पुलाचे काम जलद गतीने केले जात आहे. अशातच खालच्या पुलावरून वाहतूक बंद असताना काही नागरिकांनी पुलावर चढून विदर्भाकडून मराठवाड्यात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे.
हेदेखील वाचा : साईनाथ तारे यांच्या प्रवेशाआधीच उबाठा गटात वाद सुरु, उद्धव ठाकरे यांना अल्पेश भोईर यांचे पत्र