Worker dies after falling from roof
हिंगणा : छतावर टिनाचे पत्रे ठोकत असताना वीस फूट उंचीवरून खाली पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा एमआयडीसीतील बीएसके इंडस्ट्रीमध्ये घडली. कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता केली जात आहे. यासाठी भारतीय जनता कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मृतक कामगाराचा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवला होता. यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
राजेश पटेल (वय ३२, रा. रीवा, मध्यप्रदेश, हल्ली मुक्काम बुट्टीबोरी) असे यामध्ये मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मृतक कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी व्यवस्थापनासोबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मृतक कामगाराचे शव कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर अॅम्बुलन्समध्ये ठेवण्यात आले होते. यासंबंधी चर्चेची फेरी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस प्रशासन आता योग्य ती कारवाई करेल, अशी माहिती आहे.
दरम्यान, हिंगणा एमआयडीसीतील बीएसके इंडस्ट्रीमध्ये ठेकेदाराकडे कामगार म्हणून 4 सप्टेंबरला राजेश पटेल छताचे सिमेंट टिन बसवण्यासाठी आला होता. छप्परचे टीन लावत असताना जवळपास 20 फुटावरून खाली जमिनीवर पडला.
तातडीने रुग्णालयात करण्यात आलं दाखल
गंभीर जखमी झाल्याने त्याला कंपनी व्यवस्थापनाने डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. उपचार सुरू करण्याअगोदर रस्त्यातच नेताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एम्समध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह परत कंपनीत आणण्यात आला.
पिंपरीतही इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काम चालू असताना दोन कामगार खाली पडले. त्यातील एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. चंद्रकांत यशवंत सुतार (वय ५३, रा. वडगाव रोड, आळंदी) यांचा मृत्यू झाला तर निरहार भिमन्ना मेलकेरी (४३, रा. चह्योली (बु) ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अरविंद सोळंकी यांच्या चऱ्हाेली-आळंदी रोड, आळंदी येथील साईटवर घडली.