फोटो - टीम नवराष्ट्र
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील हत्येच्या प्रकरणावरुन आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे.
हे सगळे भाजपचे प्रॉडक्ट
मागील अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा राज्यामध्ये सुरु आहे. राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नाही, असे विधान केले आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण आणखी तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील प्रकरणावरुन माफी मागितली. मात्र भाजपने छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली असे शिकवले आहे, याबद्दल ते माफी मागणार का? असे विधान भाजप नेते फडणवीस यांनी केले. यावरुन संजय राऊत म्हणाले, “आताच्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रेम नाही. कदाचित कार्यालयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा काढून अदानीचे फोटो, पुतळे लावतील ही अवस्था झाली आहे. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, प्रफुल्ल पटेल अशा अनेकांनी महाराजांचा अपमान केला. हे सगळे भाजपचे प्रॉडक्ट आहेत. अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपमध्ये आहे, यावरून भाजपचं शिवारायांवरचं प्रेम पाहा,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
काकांचा पक्ष चोरला
पुढे संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. जोडे मारो आंदोलन काय करता, समोर या, असे आव्हान अजित पवार यांनी महाविकास आघाडीला दिले होते. यावरुन प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “रडीचा डाव कुणीही खेळत नाही. जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करुन पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरु नये. त्यांच्यात कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात. जे चोरी करुन राजकारणात आले आहेत मग ते मिंधे असतील नाहीतर अजित दादा असतील, त्यांच्या तोंडात अशी मर्दांनगीची भाषा शोभत नाही,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
यांना लाज वाट्याला हवी
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर देखील निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत भाजपचे आणि मिंधे गटाचे नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वाभिमान शिकवला तो यांच्याकडे नाही. त्यामुळे लाडक्या उद्योगपतींकडून होणारा महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी हे लोक पाहात आहेत. आमचे शिवसैनिक तिथे पुतळा सोडविण्यासाठी गेले. अदानींनी 200 बाऊन्सर्स तैनात केलेत. ते आमच्या सैनिकांवर चाल करुन आले. हेच लोक हिंदुत्वाबद्दल बोलतात. शिवरायांचं नाव घेत भाषणं करतात. यांना खरं तर लाज वाटायला हवी. आम्ही तो पुतळा बाहेर काढला. स्थापना केली. आमच्या काळात मुंबई विमातळावर महाराजांचा भव्य पुतळा उभा राहिला,” अशी टीका संजय राऊत यांनी केला आहे.
CSMIA अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची विटंबना होत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत करत आहेत. मात्र प्रत्यक्षात असे नसल्याचे म्हणणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. छत्रपती शिवरायांचा हा पुतळा का झाकून ठेवण्यात आला आहे, याबद्दल त्यांनी स्पष्टता दिली आहे. CSMIA च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे की, “CSMIA मुंबई येथे सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे योग्य आणि पूर्ण संरक्षण करण्यासाठी, पुतळा तात्पुरता झाकण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेले विमानतळ म्हणून अभिमानाने आम्ही ही खबरदारी अत्यंत आदराने आणि काळजीने घेतली आहे, आमच्या वारशाच्या या प्रतिष्ठित प्रतिकाचा आम्हाला आदर आणि अभिमान आहे याची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही ही खबरदारी घेतली आहे.राजकीय लाभासाठी काही मंडळी करत असलेल्या आरोपांना सत्यता नाही. या प्रतिष्ठित पुतळ्याची अखंडता जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे स्पष्ट मत CSMIA च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.