Murder-Case
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीला स्वतःच्या घरी बोलावून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बल्लारपुरातील महाराणा वॉर्डातील सम्यक चौक परिसरात घडली.
रक्षा कुमरे (22 रा. जाकिर हुसेन वॉर्ड, बल्लारपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर या प्रकरणातील मारेकरी असलेला आकाश ऊर्फ सिनू दहागावकर (वय 29) हा या घटनेनंतर फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश दहागावकर हा नुकताच जेलमधून सुटून आला होता. तो आपली आई रामबाई दहागावकर यांच्यासोबत महाराणा वॉर्डातील सम्यक चौक या भागात राहतो. आकाश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचीही माहिती समोर आली आहे.
रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसताना आकाशने रक्षाला स्वतःच्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्यात प्रेम प्रकरणातून मोठा वाद झाला आणि हा वाद टोकाला गेला. आकाशने रक्षाला जबर मारहाण केली आणि घरातील धारदार शस्त्राने रक्षावर वार केले. ज्यामध्ये रक्षाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
आईला धक्का
हत्या केल्यानंतर मारेकरी आकाशाने घटनास्थळावरून पळ काढला. नंतर उशिरा आकाशची आई आपल्या कामावरून घरी परतल्या असता त्यांच्या घरात रक्षा कुमरे ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसली. हे दृश्य बघितल्यानंतर आकाशच्या आईला जबर धक्क बसला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती लगेच परिसरातील लोकांना सांगितली आणि जमलेल्या लोकांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.