जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे आयशर वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील (Accident News) पती-पत्नी ठार झाले, तर लहान मुलगा किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघाताची नोंद नशिराबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शेनफडू बाबुराव कोळी (३५, रा. सामरोद ता. जामनेर) हे त्यांची पत्नी भारती कोळी (३२) व मुलगा रुद्र (३) यांच्यासह सामरोद येथे कुटुंबासह शेती काम करून राहतात. ते शनिवारी सकाळी आसोदा येथे त्यांच्या नातेवाईकाकडे भेटीसाठी आले होते. तेथून सकाळी नऊच्या सुमारास ते परत निघाले. त्यांचा दाजी शंकर कोळी याने, त्यांना नशिराबाद, कुन्हा मार्गे सामरोदला जाता येईल असे सांगितले. त्यानुसार ते नशिराबाद मार्गे दुचाकीने निघाले.
दरम्यान, काही वेळानंतर नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ आयशर वाहनाने धडक दिल्यामुळे ते जागीच कोसळले. त्यात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे उपचारादरम्यान शेनफडू याचा मृत्यू झाला आहे. तर रुद्रला किरकोळ मार लागला असून, तो सुखरूप आहे.