अपघातग्रस्तांना आता एक लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा
मुंबई : रस्ते अपघातात जखमी आणि मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत आणि अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटी अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांना दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्र्यांनी दिला. राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुंबईतील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामाचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे आदेश मंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले.
रुग्णांच्या सोयीसाठी अॅप विकसित करणार
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्यासाठी अंगीकृत आणि अन्य रुग्णालयांनी, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असेदेखील आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र ‘मोबाईल अॅप’ विकसित करण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला.
कॅन्सरग्रस्त रुग्णांची माहिती असावी
कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांची माहिती अचूकपणे भरावी. जिल्हास्तरावर अधिकारी व उपसंचालक यांनी अधिनस्त संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देशदेखील आरोग्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिली जात आहे.