सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लष्कर तसेच कोंढवा भागात बंद घरे फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली असून, दोन गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन गुन्हेगार हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. आर्यन अजय माने उर्फ मॉन्टी (वय २१, रा. फुरसुंगी) व विशाल मारूती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) व ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, उपनिरीक्षक राहुल घाडगे, रमेश चौधर व त्यांच्या पथकाने केली आहे.
आर्यन माने व ओमकार गोसावी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर हडपसर, वानवडी व लोणीकंद या पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. शहरात वाढलेल्या गुन्हेगारी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. दरम्यान, लष्कर पोलिस ठाण्यात एका ऑफिसमध्ये घुसून चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यामध्ये आरोपी कैद झाले होते.
माहिती घेत असताना पोलिस अंमलदार सागर हराळ व लोकेश कदम यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, या तिघांना पथकाने पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. अधिक तपासात त्यांच्याकडून कोंढव्यात देखील घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. लष्कर पोलिस अधिक तपास करत आहेत.
धनकवडीत वाहने फोडणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
पुण्यातील धनकवडीत वाहनांची तोडफोड करणार्या टोळक्याला सहकारनगर पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे. त्यात एक सराईत असून, तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, मित्राला भेटायला आल्यानंतर दारुच्या नशेत टोळक्याने वाहने फोडल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. रोहीत कैलास आढाव (वय २१, रा.किरकीटवाडी), सुधीर बाप्पु सावंत (वय १९, रा.गोरावी वस्ती, नांदेड फाटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील आढाव रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी तिघा अल्पवयीन साथीदारांच्या साथीने वाहन-तोडफोड केली होती. ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलींद मोहीते, वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल पवार, सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.