
हेल्मेट न वापरणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार; अपघात रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : दुचाकीवरून प्रवास करताना अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आरटीओ विभागाने दिला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीएमपीएमएल आणि एसटी महामंडळाच्या बसचालकांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी आणि अधिकारी हेल्मेट न घालता दुचाकीवरून ये-जा करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे अशा निष्काळजी वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी विभाग अधिक सतर्क झाला आहे. संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हेल्मेट न घातल्यास त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
हेदेखील वाचा : Pune Metro: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार! ‘या’ मेट्रोमार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू
दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार बसचालकांसाठी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येणार आहेत. अपघात टाळणे, सुरक्षित वाहनचालक पद्धती, वाहतूक नियमांचे पालन याबाबत तज्ञाकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर असून सर्वच विभागांना नियम पालनाबाबत काटेकोर भूमिका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार?
शहराच्या पूर्व भागात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे आता मेट्रोचा विस्तार हा काळाची गरज बनला आहे. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) लवकरच रामवाडी ते वाघोळी या ११.६३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे.
दुहेरी संरचनेचा फ्लायओव्हर
या मार्गावर महा मेट्रोकडून एक अभिनव ‘डबल डेक्कर’ फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे. म्हणजे वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका आणि खालच्या स्तरावर वाहतुकीसाठी रस्ता असेल. यामुळे जागेचा उत्तम वापर होणार असून, पुणेकरांना अखंड आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल. तो पुणे शिरूर उन्नत रस्त्याचा भाग असेल.