
पनवेल : पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे (Adya Krantiveer Vasudev Balwant Phadke Panvel) काम सुरु होते. दोन महिने देखभाल दुरूस्तीच्या विश्रांतीनंतर पनवेल महापालिकेचे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह १६ जूनला मनोरंजनाचा श्री गणेशा करण्यात येणार आहे. पुन्हा जोमाने नाट्यगृह सुरू होणार असल्याने नाट्यरसिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार असून नाट्यकलाकारांच्या सुद्धा अडचणी दूर होणार आहेत. या नाट्यगृहाच्या श्रीगणेशाची जोरदार तयारी सुरु आहे.
११ वर्षांपूर्वी नाट्यगृह बांधण्यात आले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात नाट्यगृहाला गळती लागली होती. रंगमंचाच्या वरील भागातून पावसाळ्यामधून पाणी पडत असल्यामुळे सुरूवातीलाच रंगमंच खराब झाला होता. रंगमंचाची खालील टेबल त्याचबरोबर पावसामुळे लाकडाचे फर्निचर कमकुवत झाले होते. पनवेल महापालिका क्षेत्रात नव्हे तर कर्जत, पेण, पनवेल आणि उरण या चार तालुक्यात नाट्यगृह नसल्यामुळे अनेक नाट्यरसिक पनवेलला येत असतात. नाट्यगृहात नाट्यप्रयोगांसह अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्यामुळे रंगमच खराब झाला होता. नाट्यकलाकारांच्या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी नाट्यगृह दुरूस्तीचा निर्णय घेतला होता. राज्यातील सर्वांत अनुभवी कंपनीला हे काम दिल होते. त्यानंतर लगेचच कंपनीने नाट्यगृहाचे काम सुरु केले. त्यामुळे मार्च महिन्यात बंद करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे काम दोन महिने सुरू होते. रंगमंचाचे पूर्णपणे नुतनीकरण करण्यात आले आहे.
नाट्यगृहाच्या सर्व विंग्ज बदलण्यात आल्या असून आवश्यक असेल तेव्हाच समोरचा दरवाजा उघडण्यात येईल. त्याचबरोबर बसण्यासाठी असलेल्या सीट्सला नंबर नसल्यामुळे प्रेक्षकांना आपले आरक्षित सीट्स शोधणे अवघड जात होते. त्यामुळे प्रत्येख खुर्चीला नंबरनुसार झाकण टाकण्यात आले आहे. नाट्यगृह देखभाल दुरूस्तीसाठी नामांकित असलेल्या पांडूरंग कोठारे असोसिएट्स या कंपनीने हे काम केले आहे. या कामांमुळे नाट्यगृहाला नवी झळाली मिळाली आहे. १६ जूनपासून नाट्यगृह सर्वांसाठी खुले होणार आहे. नाटकांच्या बुकीग देखील सुरू करण्यात आल्या असल्याचे नाट्यगृहाचे व्यस्थापक राजेश डोंगरे यांनी दैनिक नवराष्ट्रला सांगितले.