देवगड : आता शिरगाव पाठोपाठ आरे गावामध्ये ही गवा रेड्यांचा वावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार १२ मे रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास आरे गावातील बोडदेवाडी येथे बोडदेव मंदिर परिसरामध्ये गवारेडा पाहायला मिळाला. सध्या आंबा आणि काजू पिकाचा हंगाम असल्याने गावातील लोक आपल्या काजू बागेत आंबा बागेत असतात. तसेच या बागेत काम करण्यासाठी महिला वर्ग आणि पुरुष मंडळी देखील जात असतात. येथील बागायतदारांच्या बागा या बहुतांशी जंगलमय भागात आहेत. याच परिसरात शेत जमिनीमध्ये येथील लोक ये-जा करत आहेत.
[read_also content=”वडाळा कार पार्किंग बांधकाम कोसळलं, मुंबईत वादळी वाऱ्याचं थैमान! https://www.navarashtra.com/maharashtra/wadala-car-parking-construction-collapsed-stormy-wind-in-mumbai-532945.html”]
शिरगावमध्ये झालेल्या तीन घटना नुकत्याच ताज्या असताना आता आरे गावातही गवारेडा दिसू लागल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराबाहेर पडावे तरी कसे? असा प्रश्न येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. आरे भागातील बहुतांशी लोकांच्या आंबा काजूच्या बागा आहेत आणि या जंगलमय परिसरात असल्यामुळे या ठिकाणी येथील लोकांचा वावर सायंकाळी उशिरापर्यंत असतो. मात्र आता गवारेड्याचा वावर वाढू लागल्याने येथील बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने याबाबतची खबरदारी म्हणून आरे गावात येऊन उपायोजना आणि समुपदेशन करावे. तसेच गावात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी केली आहे.